अभिनेता अजय देवगणचे वडील अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 02:28 PM2019-05-27T14:28:27+5:302019-05-27T14:29:55+5:30
वीरू देवगण यांचे आज सकाळी निधन झाले असून विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.
वीरू देवगण यांनी बॉलिवूडमध्ये अॅक्शन डायरेक्टर, दिग्दर्शक, निर्माते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे आज सकाळी निधन झाले असून विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. वीरू देवगण यांना हृदयविकाराचा झटका आल्याने सांताक्रूजमधील सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वीरू देवगण गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होते आणि त्याचमुळे अजयने दे दे प्यार दे या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी काही मुलाखती रद्द केल्या होत्या.
वीरु देगगण यांनी ८० हून जास्त चित्रपटांमध्ये अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले. वीरू यांनी लाल बादशहा, इश्क, क्रांती, जान, हकीगत यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अॅक्शन डायरेक्ट म्हणून काम केले आहे. वीरु यांनी क्रांती, सौरभ, सिंहासन यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्यांनी हिंदुस्थान की कसम या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासोबतच या चित्रपटाची निर्मिती केली होती. तसेच दिल क्या करे या चित्रपटाचे निर्माते देखील तेच होते.
वीरु देवगण यांच्या पश्चात चार मुले असून अभिनेता अजय देगगण हा त्यांचा मुलगा आहे. अभिनेत्री काजोल ही त्यांची सून असून अजय आणि काजोलसोबत अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात ते हजेरी लावत.