‘वलिमै’ व ‘भीमला नायक’ची ‘गंगुबाई काठियावाडी’ वर मात, तीनच दिवसांत छप्परफाड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 06:05 PM2022-02-28T18:05:31+5:302022-02-28T18:46:41+5:30
Valimai And Bheemla Nayak Box Office Collection : ‘पुष्पा’नंतर साऊथच्याआणखी दोन सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर हवा केली आहे आणि या दोन चित्रपटांचा मुकाबला आलिया भटच्या ‘गंगुबाई काठियावाडी’शी आहे. तूर्तास बॉक्स ऑफिसचा सीन कसा आहे?
यावर्षी ‘पुष्पा- द राईज’ या साऊथच्या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घातला. इतका की, ‘पुष्पा’च्या लाटेत रणवीर सिंगच्या ‘83’ची चांगलीच दाणादाण झाली. ‘पुष्पा’नंतर साऊथच्याआणखी दोन सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर हवा केली आहे आणि या दोन चित्रपटांचा मुकाबला आलिया भटच्या ‘गंगुबाई काठियावाडी’शी आहे. तूर्तास बॉक्स ऑफिसचा सीन कसा आहे? तर अजीत कुमारचा ‘वलिमै’ (Valimai) आणि पवन कल्याणच्या ‘भीमला नायक’ (Bheemla Nayak) या दोन चित्रपटांनी तीनच दिवसांत 100 कोटींचा पल्ला गाठला आहे तर आलियाच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ला (Gangubai Kathiawadi) तीन दिवसांत फक्त 39.12 कोटींचा गल्ला जमवता आलाये.
‘वलिमै’ची रेकॉर्डब्रेक कमाई
अजित कुमारचा ‘वलिमै’ गेल्या 24 फेबु्रवारीला रिलीज झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी एकट्या तामिळनाडूत 36 कोटींची रेकॉर्डबे्रक कमाई केली आणि तीनच दिवसांत 100 कोटींचा आकडाही पार केला. आज सोमवारी दिवसाअखेर हा सिनेमा 150 कोटींचा आकडा पार करू शकतो, असा जाणकारांचा दावा आहे. हा सिनेमा एच. विनोद यांनी दिग्दर्शित केला आहे. अजितकुमार शिवाय हुमा कुरेशी व कार्तिकेय या चित्रपटात लीड रोलमध्ये आहेत.तामिळसह तेलगू, कन्नड आणि हिंदी अशा चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
‘भीमला नायक’ ही सर्वांवर भारी
पवन कल्याणचा ‘भीमला नायक’ हा साऊथचा तेलगू सिनेमा 25 तारखेला प्रदर्शित झाला. या सिनेमानेही तीनच दिवसांत 100 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 36 कोटींचा गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशी 27 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 37 कोटींचा बिझनेस केला. आत्तापर्यंत या चित्रपटाने 100.73 कोटींची कमाई केली आहे.
‘भीमला नायक’ हा सिनेमा तेलगूसोबत हिंदीतही रिलीज झाला आहे. यात पवन कल्याणसोबत राणा दग्गुबतीही मुख्य भूमिकेत आहेत.
‘गंगुबाई काठियावाडी’ने संथ सुरूवात
‘गंगुबाई काठियावाडी’ या आलियाच्या चित्रपटाकडून सर्वांनाच फार अपेक्षा होत्या. पण या चित्रपटाला भीमला नायक आणि वलिमैच्या तुलनेत फार अल्प प्रतिसाद मिळाला. भारतात ‘गंगुबाई काठियावाडी’ने तीन दिवसांत 39.12 कोटींची कमाई केली. साऊथचे दोन्ही सिनेमे ज्या वेगाने कमाई करत आहेत त्या तुलनेत आलियाच्या सिनेमाची ही कमाई फारच तुटपूंजी आहे. अर्थात ‘गंगुबाई काठियावाडी’ हळूहळू वेग घेतोय. दुसऱ्या व तिसऱ्या दिवसांच्या कमाईत वाढ पाहायला मिळतेय.