Valimai Movie Review : अजिथची ॲक्शन-पॅक्ड पोलीस कथा
By संदीप आडनाईक | Published: February 25, 2022 12:27 PM2022-02-25T12:27:13+5:302022-02-25T13:52:25+5:30
‘वलिमाई’ ही गुन्ह्यांच्या मालिकेमागील सूत्रधाराचा शोध घेणाऱ्या एक हुशार पोलिसाची कथा आहे.
संदीप अडनाईक
दोन वर्षांनंतर पुन्हा पडद्यावर आलेल्या अजिथची प्रमुख भूमिका असलेला एच. विनोथ दिग्दर्शित ‘वलिमाई’ हा ॲक्शन-थ्रिलर प्रेडिक्टेबल चित्रपट आहे. ‘पुष्पा’ सिनेमाला पॅन इंडिया मिळालेल्या प्रतिसादामुळे अजिथ या अभिनेत्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेत हा सिनेमाही पॅन इंडिया रिलीज केला गेला आहे. बोनी कपूर यांनी हिंदी भाषेत हा सिनेमा रिलीज केला आहे.
‘वलिमाई’ ही गुन्ह्यांच्या मालिकेमागील सूत्रधाराचा शोध घेणाऱ्या एक हुशार पोलिसाची कथा आहे. यात उत्कृष्ट अॅक्शन सीक्वेन्स आहेत. चेन स्नॅचिंगच्या घटनांच्या मालिकेमुळे लोक गंभीर जखमी होतात. बाईकवर मुखवटा घातलेले लोक ड्रग्ज विकत आहेत. सिंडिकेट प्रमुख असलेला ड्रग माफियाचा (कार्तिकेय गुममाकोंडा) आणि मास्टरमाइंडचा शोध घेण्यासाठी तामिळनाडू पोलीस मदुराईहून सुपरकॉप अर्जुनला (अजिथ) आमंत्रित करतात, इतकी साधी कथा असलेला हा सिनेमा केवळ अजितकुमारच्या फॅन्सना समोर ठेवून बनवलेला आहे.
दिग्दर्शक एच. विनोथच्या ‘थेरन अधीगारम ओंद्रू’प्रमाणे ‘वलीमाई’मध्येही सामान्य लोकांना कशी मदत केली जात नाही या व्यवस्थेबद्दल भाष्य केले आहे. तथापि, ‘थेरन’इतका हा सिनेमा प्रभावी नाही. या सिनेमाची पटकथा म्हणजे अजिथ आणि कार्तिकेय यांच्यातील उंदीर-मांजराचा खेळ ठरतो. या चित्रपटातील दुचाकी आणि पोलीसव्हॅनचा पाठलागदृश्य प्रेक्षकांसाठी खूप थरारक आहे.
अजिथव्यतिरिक्त, कार्तिकेय गुम्माकोंडाने खलनायक म्हणून जोरदार अभिनय केला आहे. सोफियाच्या भूमिकेत हुमा कुरेशीने चांगली कामगिरी केली आहे. तिला फाईट सीक्वेन्स मिळालेले असले तरी तिचे पात्र कंटाळवाणे झाले आहे. उच्च अधिकारी असूनही चौकशीत तिला काय करायचे आहे हे अजिथला स्पष्ट करावे लागते. जी. एम. सुंदरची कामगिरी सर्वांत वेगळी आहे. वलीमाईचा उत्तरार्थ कौटुंबिक भावनेने भरलेला आहे. पात्रे पडद्यावर दिसण्याआधी, घिब्रानच्या पार्श्वसंगीतामुळे हेड-अप दिले जाते. प्रेक्षकांना भावुक करण्याचा हा एक संकेत आहे. बाइक चेस सीक्वेन्सची नीरव शाहची सिनेमॅटोग्राफी उत्कृष्ट आहे. युवा शंकर राजा यांचे नांगा वेरा मारी हे गाणे, प्रेक्षकांमध्ये नाट्य वाढवते. वलीमाईची कथा पारंपरिक असली तरी वेगवान आहे. त्याला एच. विनोथने आकर्षक बनविले आहे.