Akshay Kumar: विमलची जाहिरात केल्याने अक्षय कुमार ट्रोल, आता माफी मागत केलं मोठं विधान, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 08:00 AM2022-04-21T08:00:55+5:302022-04-21T09:03:00+5:30
Akshay Kumar News: बॉलिवूडमधील सुपरस्टार अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून विमलच्या जाहिरातीमध्ये दिसत आहे. त्यामुळे अक्षय कुमारला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना केल्यानंतर आता अक्षय कुमारने मोठी घोषणा केली आहे.
मुंबई - बॉलिवूडमधील सुपरस्टार अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून विमलच्या जाहिरातीमध्ये दिसत आहे. या जाहिरातीमध्ये त्याच्यासोबत शाहरुख खान आणि अजय देवगन हेसुद्धा दिसत आहे. या जाहिरातीत काम केल्यान शाहरुख खान आणि अक्षय कुमारचं फार काही बिघडलं नाही. मात्र अक्षय कुमारला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना केल्यानंतर आता अक्षय कुमारने मोठी घोषणा केली आहे.
अक्षय कुमारने या जाहिरातीसाठी आपल्या चाहत्यांची माफी मागितली आहे. तसेच आता आपण तंबाखू ब्रँड विमलचा ब्रँड अॅम्बॅसेडर राहणार नाही, असे सांगितले. अक्षय कुमारने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या या निर्णयाबाबत सांगितले आहे.
अक्षय कुमारने इन्स्टा पोस्टमध्ये लिहिले की, मला माफ करा. मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांमध्ये आलेल्या प्रतिक्रियांमुळे मला खूप प्रभावित केले आहे. मी कधीही तंबाखूच्या सेवनाचे समर्थन केलेले नाही. तसेच यापुढेही करणार नाही. विमल इलायचीसोबत माझ्या जाहिरातीबाबत समोर आलेल्या तुमच्या भावनांचा मी सन्मान करतो. त्यामुळे या जाहिरातीमधून मी संपूर्ण नम्रतेने माघार घेतो.
तसेच या जाहिरातीमधून मिळालेल्या मानधनाबाबतही मी एक निर्णय घेतला आहे. हे मानधन मी एखाद्या चांगल्या कामासाठी खर्च करेन. या जाहिरातीबाबत झालेल्या कराराचा कायदेशीर कालावधी पूर्ण होईपर्यंत ब्रँड ही जाहिरात प्रक्षेपित करू शकते. मात्र मी वचन देतो की, मी पूर्ण समजुतदारपणे पर्यायांची निवड करेन. तसेच तुमच्याकडून प्रेम आणि शुभेच्छा मागत राहीन.
काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारची ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीमधून शाहरुख खान आणि अजय देवगनने अक्षय कुमारचं विमल युनिव्हर्समध्ये स्वागत केलं होतं. बॉलिवूडमधील तीन स्टार या जाहिरातीसाठी एकत्र आले होते. त्यामुळे ही जाहिरात ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. त्यातही अजय देवगन आणि शाहरुख खान तंबाखूच्या जाहिरातीमध्ये आधीही दिसत होते. मात्र अक्षय कुमारने या जाहिरातीत सहभाग घेतल्यावर वादाला तोंड फुटले.