'बड़े मियां छोटे मियां 2'? अली अब्बास जफरच्या चित्रपटात दिसू शकते अक्षय-टायगरची जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 20:22 IST2021-12-23T20:18:29+5:302021-12-23T20:22:21+5:30
मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपट निर्माते वाशु भगनानी दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबत 1998 मध्ये आलेल्या 'बड़े मियां छोटे मियां'च्या धर्तीवर एक चित्रपट बनवत आहेत. यात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ दिसू शकतात.

'बड़े मियां छोटे मियां 2'? अली अब्बास जफरच्या चित्रपटात दिसू शकते अक्षय-टायगरची जोडी
मुंबई: अॅक्शन चित्रपटांची आवड असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि आजच्या काळातील अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ सोबत काम करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात येतोय. हा दावा जर खरा असला, तर अॅक्शनपटाची आवड असणाऱ्यांसाठी ही मोठी पर्वणी असणार आहे. यापुर्वी टायगरने ह्रतिक रोशनसोबत 'वॉर' या अॅक्शनपटात काम केले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अली अब्बास जफर दिग्दर्शित पुढील चित्रपटात दिसणार आहेत. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, या चित्रपटाचे शीर्षक 'बडे मियाँ छोटे मियाँ' असू शकते. गोविंदा आणि अमिताभ बच्चन यांच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या धर्तीवर हा चित्रपट बनवण्याची निर्मात्यांची योजना आहे.
1998 मध्ये आलेल्या या चित्रपटात अमिताभ आणि गोविंदा दोघेही दुहेरी भूमिकेत दिसले होते. त्यात रवीना टंडन आणि रम्या कृष्णन देखील होत्या. तो चित्रपट डेव्हिड धवनने दिग्दर्शित केला होता. आता त्याच चित्रपटाच्या धर्तीवर अक्षय आणि टायगर एका चित्रपटात दिसू शकतात.
या चित्रपटाची निर्मिती वाशू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा भगनानी करू शकतात. अली अब्बास जफर आणि वाशू भगनानी यांच्यात या चित्रपटाबाबत बोलणेही झाल्याची माहिती आहे. पण, अद्याप यावर दोघांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, सर्वकाही सुरळीत झाल्यास 2023 मध्ये प्रेक्षकांना अक्षय-टायगरची जोडी पाहायला मिळू शकते.
दोन्ही स्टार या चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्थ
सध्या अक्षय आणि टायगर वाशू भगनानीच्या प्रोडक्शनमध्ये बनत असलेल्या चित्रपटांमध्ये काम करत आहेत. अक्षय कुमारने यापूर्वी वाशू भगनानीसोबत 'बेल बॉटम'मध्ये काम केले असून ते अक्षयच्या आगामी 'सिंड्रेला'ची निर्मितीही करत आहे. यासोबतच टायगर भगनानींच्या 'गणपत' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.