‘अक्षय कुमारनं नाइलाजानं केलं द कश्मीर फाइल्सचं कौतुक'; विवेक अग्निहोत्रींनी केला मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 04:00 PM2022-05-09T16:00:14+5:302022-05-09T16:03:09+5:30
खरे तर, द कश्मीर फाइल्स चित्रपटाने बॉलीवुडची विभागणीच दोन भागांत केली होती. त्यावेळीही सुपरस्टार अक्षय कुमारने चित्रपटाचे कौतुक केले होते. एवढेच नाही, तर त्यावेळी डायरेक्टर विवेक अग्निहोत्री यांनी एक व्हिडिओ शेअर करत अक्षयचे आभारही माणले होते. मात्र आता...
नवी दिल्ली - विवेक अग्निहोत्री यांचा द कश्मीर फाइल्स हा चित्रपट वर्ष 2022 मधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची कथा 1990 च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित आहे. हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, पहिल्या दिवसाचे कलेक्शन फारसे समाधानकारक नव्हते. मात्र, या चित्रपटाच्या वर्ड टू माउथ पब्लिसिटीनंतर तिकीट खिडक्यांवर प्रचंड गर्दी होऊ लागली होती.
खरे तर, द कश्मीर फाइल्स चित्रपटाने बॉलीवुडची विभागणीच दोन भागांत केली होती. त्यावेळीही सुपरस्टार अक्षय कुमारने चित्रपटाचे कौतुक केले होते. एवढेच नाही, तर त्यावेळी डायरेक्टर विवेक अग्निहोत्री यांनी एक व्हिडिओ शेअर करत अक्षयचे आभारही माणले होते. मात्र आता, विवेक अग्निहोत्री यांनी अक्षयवर आरोप केला आहे.
अक्षय कुमारवर केला आरोप -
विवेक अग्निहोत्री, आरजे रौनक यांच्यासोबत एका मुलाखतीत म्हणाले, की त्यांच्या चित्रपटाला बॉलीवुडकडून सपोर्ट मिळाला नाही. विवेक म्हणाले, अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ फ्लॉप झाला. यामुळे त्याला ‘द कश्मीर फाइल्स’चं कौतुक करावं लागलं. यावेळी आरजे रौनक म्हणतात, की ‘बॉलीवुडमधील सर्वच लोकांनी आपल्या चित्रपटाचे कौतुक केले आहे.‘ यावर विवेक अग्निहोत्री म्हणाले, ‘जसे… जसे नावे सांगा’
नाइलाजानं केलं होतं चित्रपटाचं कौतुक -
आरजे रौनक म्हणाले, ‘अक्षय कुमारने कौतुक केलं होतं.’ यावर विवेक म्हणाले, 'ते तर नाइलाजाने, जेव्हा शंभर लोक समोर उभे राहून प्रश्न विचारत असतील, की कश्मीर फाइल्स चालला, आपला चित्रपट चालला नाही, तेव्हा काय सांगणार माणूस? मी भोपाळमध्ये एका कार्यक्रमात होतो, तर त्यांना बोलावे लागले.' पुढे विवेक म्हणाले, ‘मागे कुणीही कौतुक करत नाही, ना कुणी मेसेज करून आपले कौतुक केले. खरे तर, असे होत होते, की ते आपल्या चित्रपटाच्या प्रचारासाठी जात होते आणि माध्यमांचे लोक त्यांना कश्मीर फाइल्सवर प्रश्न विचारत होते. यामुळे त्यांना बळजबरी बोलावे लागत होते.'