अक्षय कुमारने थेट RTO अधिकाऱ्याच्या गाडीला दिली होती धडक, म्हणाला - 'मी घाबरलो आणि भीतीपोटी...'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 12:44 PM2024-05-22T12:44:11+5:302024-05-22T13:01:08+5:30
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार हा चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे
बॉलिवूडचा 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार हा चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या प्रतिभेच्या जोरावर या अभिनेत्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लाखो चाहत्यांच्या मनावर तो राज्य करतो. अक्षय कुमार मार्शल आर्ट्समध्ये निपुण असून सिनेमामध्ये स्टंट करताना मागेपुढे पाहत नाही. पण, तुम्हाला माहितेय एकदा अक्षयची गाडी थेट आरटीओ अधिकाऱ्याच्या बाईकला धडकली होती.
अलिकडेच अक्षयने शिखर धवनच्या चॅट शोमध्ये रंजक गोष्टी शेअर केल्या. या मुलाखतीत अक्षयने बँकॉकमध्ये झालेल्या एका छोट्या अपघाताबद्दल सांगितले. तो म्हणाला, 'विनम्रतेमुळे प्रत्येक अडचणी सुरळीत होतात. एकदा गाडी चालवताना मी चुकून एका आरटीओ अधिकाऱ्याच्या बाईकला धडक दिली. त्यामुळे आम्ही दोघेही पडलो. मी घाबरलो आणि भीतीपोटी मी लगेच त्याची माफी मागितली. यावर त्या अधिकाऱ्याने माझी बाईक आणि हेल्मेट उचलण्यास मदत केली. तसेच त्याने शांतपणे मला सावकाश आणि सावधपणे गाडी चालवण्याचा सल्ला दिला'.
अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, नुकतेच त्याचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा ॲक्शन थ्रिलर सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने जगभरात १०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. अक्षय कुमार लवकरच रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' (Singham Again) या सिनेमात झळकणार आहे. यासोबतच खिलाडी कुमारचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. 'स्काय फोर्स' हा त्याचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तसेच अभिनेत्याचे 'वेलकम टू द जंगल','हाऊसफुल्ल 5' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.