"माझे १६ सिनेमे फ्लॉप गेले होते", बॉक्स ऑफिसवरील अपयशाबद्दल अक्षय कुमार स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 12:10 PM2024-03-27T12:10:46+5:302024-03-27T12:11:07+5:30
'सेल्फी' आणि 'मिशन रानीगंज'च्या बॉक्स ऑफिस अपयशाबद्दल अक्षयने सोडलं मौन
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने ९०च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमे दिले. 'मै खिलाडी तू अनारी', 'खिलाडी', 'सौगंध', 'जानवर', 'अंदाज', 'हाऊसफूल' अशा ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम करत अक्षयने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. पण, सध्या मात्र अक्षयची गाडी ट्रॅकवरुन घसरली आहे. गेले काही सिनेमे फ्लॉप गेल्याने अक्षयची बॉक्स ऑफिसवरील जादू फिकी पडत आहे. सध्या अक्षय कुमार 'बड़े मियां छोटे मियां' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातून तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बड़े मियां छोटे मियां' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान अक्षयने सिनेमांच्या अपयशाबद्दल भाष्य केलं.
अक्षय कुमार म्हणाला, "आम्ही सगळ्या प्रकारच्या सिनेमांसाठी प्रयत्न करतो. मी एकाच प्रकारचे सिनेमे करत नाही. अनेक जॉनरचे सिनेमे मी केले आहेत आणि आतादेखील करत आहे. मग यश मिळो किंवा नाही...मी नेहमी याच पद्धतीने काम केलं आहे. आणि अशाच पद्धतीने यापुढेही मी काम करत राहीन. सामाजिक, चांगला विषय असलेले, कॉमेडी आणि अॅक्शन असलेले चित्रपटही मी करेन. लोक काय म्हणतात याचा माझ्यावर कामावर कधीच परिणाम होत नाही. प्रेक्षकांना कॉमेडी आणि अॅक्शनपट आवडतात म्हणून अभिनेत्याने केवळ त्याच जॉनरचे सिनेमे केले पाहिजेत, असं नाही. एकाच प्रकारचे सिनेमे केल्याने कंटाळा येतो. असे चित्रपट कधी कधी चालतातही. पण, त्यामुळे कामात कोणतंच नाविन्य दिसत नाही."
याआधीही अक्षयचे तब्बल १६ सिनेमे फ्लॉप गेले होते. त्या काळाची अक्षय कुमारने आठवण करून दिली. "मी हे पहिल्यांदाच अनुभवत नाहीये. एक वेळ अशी होती जेव्हा माझे १६ सिनेमे फ्लॉप गेले होते. पण, मी तेव्हादेखील काम करत राहिलो. आताही मी तेच करणार आहे," असंही पुढे अक्षयने सांगितलं.
'सेल्फी'नंतर अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज' सिनेमाही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे आता अक्षयच्या 'बड़े मिया छोटे मिया' सिनेमाकडून अपेक्षा आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरतो की हिट याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. अक्षयबरोबर या सिनेमात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. ईदच्या मुहुर्तावर १० एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.