बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारची ब्रँड व्हॅल्यू सर्वात जास्त, पाठोपाठ रणवीर सिंगचा नंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 02:23 PM2021-02-05T14:23:12+5:302021-02-05T15:02:01+5:30
या यादीमध्ये सलग चौथ्या वर्षीही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली प्रथम क्रमांकावर आहे. यानंतरचे 2 ते 10 हे नंबर मात्र बॉलिवूड सेलिब्रिटींनी पटकावले आहेत
डफ एंड फेल्प्सने 2020 मधील भारतातील सर्वात जास्त ब्रँड व्हॅल्यू असलेल्या व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये सलग चौथ्या वर्षीही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली प्रथम क्रमांकावर आहे. यानंतरचे 2 ते 10 हे नंबर मात्र बॉलिवूड सेलिब्रिटींनी पटकावले आहेत. यादीत विराट कोहलीनंतर कोणाचे नाव आहे तर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचे. याचाच अर्थ म्हणजे, अक्षय भारतात सर्वात जास्त ब्रँड व्हॅल्यू असलेला बॉलिवूड अभिनेता ठरला आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू 867 कोटी रूपये आहे.
अक्षयनंतर या यादीत रणवीर सिंग, शाहरूख खान, दीपिका पादुकोण, आलिया भट, सलमान खान, अमिताभ बच्चन व हृतिक रोशन यांचा समावेश आहे. अभिनेत्रींबद्दल सांगायचे तर दीपिका पादुकोण टॉप मोस्ट व्हॅल्युएबल फिमेल सेलिब्रिटी ठरली आहे. तिच्यानंतर आलिया भटचे नाव आहे.
अक्षय पाठोपाठ रणवीर सिंग 750 कोटी रुपयांसह तिस-या क्रमांकावर आहे. रणवीरने सलग दुस-या वर्षी या यादीतील तिसरे स्थान कायम ठेवले आहे.
या यादीत बॉलीवुडचा बादशहा शाहरुख खान 372 कोटी रुपयांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच दीपिका पादुकोण (367 कोटी )व आलिया भट (349 कोटी ) अनुक्रमे पाचव्या व सहाव्या क्रमांकावर आहेत.
विशेष म्हणजे, अभिनेता आयुष्यमान खुराणाने या यादीत सलमान खान पछाडले आहे. आयुष्यमानची ब्रँड व्हॅल्यू सलमानपेक्षा जास्त आहे. आयुष्यमान या यादीत 7 व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आठव्या क्रमांकावर सलमान खानचा नंबर आहे.
सेलिब्रिटींचे प्रॉडक्स एंडोर्समेंट पोर्टफोलियो आणि सोशल मीडिया प्रेजेंसच्या आधारावर ही ब्रँड व्हॅल्यू ठरवण्यात आली आहे. सेलिब्रिटींच्या ब्रँड व्हॅल्यूवर कोरोना काळात किती परिणाम झाला, हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.