Akshay Kumar : पंतप्रधानांना ‘आंबे कसे खाता’ हा प्रश्न का विचारला? अक्षय कुमारने दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 10:26 AM2023-02-26T10:26:21+5:302023-02-26T10:28:50+5:30
Akshay Kumar : २०१९ साली अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. मुलाखतीत अक्षयने नरेंद्र मोदी यांना अनेक प्रश्न विचारले होते. पण एका प्रश्नावरून अक्षयवर बरीच टीका झाली होती.
२०१९ साली अक्षय कुमारने (Akshay Kumar) पंतप्रधान नरेंद्र माेदी (Narendra Modi) यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. मुलाखतीत अक्षयने नरेंद्र मोदी यांना अनेक प्रश्न विचारले होते. पण एका प्रश्नावरून अक्षयवर बरीच टीका झाली होती. अगदी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी यावरून टीका केली होती. नेटकऱ्यांनी देखील अक्षय कुमारची चांगलीच खिल्ली उडवली होती. तो प्रश्न म्हणजे तुम्ही आंबे कसे खाता? अक्षयने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींची ही अराजकीय मुलाखत घेतली होती. परंतु या मुलाखतीत तुम्ही आंबे कसे खाता, कापून की चोखून? असा प्रश्न अक्षय मोदींना विचारेल, अशी कुणालाच अपेक्षा नव्हती. अक्षयने हा प्रश्न विचारल्यानंतर नेटकऱ्यांनी अक्कीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. आता पुन्हा एकदा अक्षय यावर बोलला आहे.
होय, आजतकच्या सीधी बात या कार्यक्रमात अक्षय मोदींच्या त्या मुलाखतीबद्दल बोलला. शोचे होस्ट सुधीर चौधरी यांनी अक्षयला तू आंबे कसे खातोस, कापून की चोखून? असा प्रश्न केला. मग काय, सुधीर यांचा इशारा अक्षयने नेमका ओळखला. हो, मी आंबे खातो, मला आंबे आवडतात... पण तुमच्या शोचं नाव सीधी बात आहे, मग तुम्ही मला थेट प्रश्न विचारायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी हाच प्रश्न केला होता, तुम्हाला त्याचबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर मी सांगतो, अशी सुरूवात अक्षयने केली.
म्हणून विचारला होता तो प्रश्न...
तुम्ही आंबे कसे खाता, कापून की चोखून? असा प्रश्न त्या मुलाखतीत मी पंतप्रधानांना विचारला होता. तो थेट माझ्या मनातून आलेला प्रश्न होता. तेव्हा आंब्यांचं सीझन होतं. माझे काही सामान्य प्रश्न होते आणि मी ते त्यांना विचारले. एक सामान्य नागरिक जे प्रश्न विचारू इच्छितो, तेच प्रश्न मी माझ्या पद्धतीने विचारले. जे वाटलं ते त्यांना विचारलं. पंतप्रधानांची मुलाखत घ्यायला जाताना माझ्या मनात कुठलीही भीती नव्हती. मी पांढरा शर्ट आणि गुलाबी पँट घालून गेलो होतो. काय कलर घालून आलास? असं मला तेव्हा कुणीतरी म्हटलेलंही आठवतंय. त्यावर या रंगात काय वाईट आहे. सुंदर रंग आहे, असं मी म्हणालो होतो, असं अक्षय म्हणाला.
राजकारणात जाणार का?
भविष्यात राजकारणात जाणार का? असा प्रश्नही अक्षयला विचारण्यात आला. त्यावर सध्या असा कुठलाही इरादा नसल्याचं तो म्हणाला. मी राजकारणात जाणार की नाही, याबद्दल काहीही विचार केलेला नाही. भविष्यात काय होईल, हे मी आत्ता सांगू शकत नाही. सध्या तरी माझा तसा कुठलाही इरादा नाही. मला चित्रपट करायचे आहेत. लोकांचं मनोरंजन करायचं आहे. लोकांचं प्रेम मिळतंय, हेच पुरेसं आहे, असं त्याने स्पष्ट केलं.