-तर अक्षय खन्ना झाला असता कपूर घराण्याचा जावई, चाळीशी उलटल्यानंतरही आहे अविवाहित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 12:30 PM2021-03-28T12:30:20+5:302021-03-28T12:32:03+5:30
अक्षयने लग्न केलेले नाही. पण त्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जुळले. शिवाय एका अभिनेत्रीसोबत त्याचे लग्न होता होता राहिले.
आ अब लौट चले, हलचल, दिल चाहता है अशा अनेक चित्रपटांतील दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता अक्षय खन्ना याचा आज (28मार्च) वाढदिवस. लोकप्रीय अभिनेते विनोद खन्ना याचा मुलगा अशी ओळख घेऊन अक्षय खन्ना बॉलिवूडमध्ये आला. आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये अक्षयने अनेक चित्रपटांत काम केले. पण अक्षयचे करिअर म्हणावे तसे बहरले नाही.
46 व्या वर्षीही अक्षय खन्ना अविवाहित आहे. याचे खरे कारण आहे, त्याला जबाबदारी नको होती. होय, सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये अक्षयने एक खुलासा केला होता. मी कमिटमेंटसाठी कधीही तयार नव्हतो. लग्नानंतर सगळेच बदलते. मुलं झाल्यानंतर तर तुमचे आयुष्य मुलांभोवती केंद्रीत होते. ही जबाबदारी पेलायची माझी कधीच तयारी नव्हती. म्हणून मी लग्नाचा विचारच केला नाही, असे त्याने सांगितले होते.
अक्षयने लग्न केलेले नाही. पण त्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जुळले. शिवाय एका अभिनेत्रीसोबत त्याचे लग्न होता होता राहिले. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या अनेक गर्लफ्रेन्डला अक्षयने डेट केले आहे. पूजा बत्रा, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, टिष्ट्वंकल खन्ना आदींसोबत अक्षय खन्नाचे नाव जुळले. ऐश्वर्या रायसोबत त्याच्या डेटिंगच्या बातम्याही आल्या होत्या. अर्थात अक्षयने यावर कायम बोलणे टाळले.
अक्षय खन्ना व करिश्मा कपूर यांचे लग्न होता होता राहिले. करिश्मा वडील रणधीर कपूर यांना तिचे लग्न अक्षय खन्नाशी व्हावे असे वाटत होते. असे म्हणतात की, रणधीर यांनी करिश्मासाठी अक्षय खन्नाची निवड केली होती. विनोद खन्ना यांच्याकडे त्यांनी तसा प्रस्तावही पाठवला होता. पण एक व्यक्ति या लग्नाआड आली आणि हे लग्न होता होता राहिले. होय, करिश्माची आई बबीता यांनी या लग्नाला विरोध केला. त्याकाळात करिश्मा यशाच्या शिखरावर होती. करिश्माने याकाळात लग्न करू नये, अशी बबीतांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेखातर करिश्माच्या लग्नाचा विषय मागे पडला आणि अक्षय व करिश्माच्या लग्नाची बोलणीही थांबली. पुढे करिश्माने संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली पण अक्षय मात्र अद्यापही अविवाहितच आहे.
अक्षय खन्नाचा पहिला चित्रपट होता ‘हिमालय पुत्र’. पण हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप झाला. अक्षयचे पिता विनोद खन्ना हेच अक्षयच्या या चित्रपटाचे निर्माते होते. अक्षयने ना कुठला अॅक्टिंगचा क्लास लावला, ना चित्रपट पाहत सुटला. पण अक्षयने एक गोष्ट मात्र पक्की ठरवली होती. ती म्हणजे, त्याला आयुष्यात अभिनेता व्हायचे होते. त्यामुळेच वयाच्या 18 व्या वर्षी अक्षयने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले.
PHOTOS : इतक्या वर्षात इतका बदलला अक्षय खन्ना, फोटो पाहून थक्क व्हाल
‘हिमालय पुत्र’ या एका फ्लॉपनंतर अक्षय ‘बॉर्डर’ मध्ये दिसला. अक्षयचा हा दुसरा चित्रपट मात्र कमालीचा हिट झाला. नाही म्हणायला या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ असे अनेक दिग्गज स्टार होते. पण अक्षय खन्नाचे काम सगळ्यांच्याच डोळ्यात भरले. यानंतर मोहब्बत, कुदरत, लावारिस अशा अनेक चित्रपटात अक्षय झळकला. पण एकापाठोपाठ आलेले हे सगळे चित्रपट फ्लॉप गेलेत. 1999 मध्ये ऐश्वर्या रायसोबतच्या ‘आ अब लौट चले’ या चित्रपटाने अक्षयच्या करिअरला थोडा आधार दिला. हा चित्रपट फार चालला नाही. पण ऐश्वर्या व अक्षयची जोडी हिट ठरली. याच जोडीला घेऊन सुभाष घई ‘ताल’ घेऊन आलेत. या चित्रपटाने अक्षय पुन्हा प्रकाशझोतात आला. 2001 मध्ये आलेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटात अक्षयने आमिर खान, सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर केली आणि यातील त्याचा परफॉर्मन्स सगळ्यांच्याच डोळ्यांत भरला. ‘गांधी-माय फादर’ या चित्रपटात अक्षयने महात्मा गांधी यांचा मुलगा हरिलाल गांधी यांचे पात्र साकारले. ही भूमिका अक्षयच्या आत्तापर्यंतच्या कारकिदीर्तील सगळ्यांत वाखाणली गेलेली भूमिका आहे.