'तारे जमीन पर'साठी आमिर खानऐवजी अक्षय खन्नाला होती पहिली पसंती, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:07 IST2025-02-20T15:06:40+5:302025-02-20T15:07:47+5:30
Akshaye Khanna : अभिनेता अक्षय खन्ना सध्या 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेत्याने औरंगजेबची भूमिका साकारली आहे. त्याच्या या सिनेमातील लूक आणि अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.

'तारे जमीन पर'साठी आमिर खानऐवजी अक्षय खन्नाला होती पहिली पसंती, पण...
अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) सध्या 'छावा' चित्रपटामुळे (Chhaava Movie) चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेत्याने औरंगजेबची भूमिका साकारली आहे. त्याच्या या सिनेमातील लूक आणि अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.अक्षय खन्नाने त्याच्या करिअरमध्ये पाथ ब्रेकिंग सिनेमा आणि अभिनयाने चाहत्यांना हैराण केले आहे. तुम्हाला माहित आहे का की, 'तारे जमीन पर' (Taare Zameen Par) सिनेमासाठी आमिर खान(Aamir Khan)च्या भूमिकेसाठी अक्षय खन्नाला पहिली पसंती होती.
अमोल गुप्ते यांनी 'तारे जमीन पर' या सिनेमाची कथा लिहिली होती आणि त्यांना या सिनेमात अक्षय खन्नाला मुख्य भूमिकेसाठी कास्ट करायचे होते. मात्र आमिर खानने ही भूमिका साकारली. अक्षय खन्नाने २०२२ साली एका मुलाखतीत सांगितले होते की, आमिर खानने त्याच्याकडून 'तारे जमिन पर' हा सिनेमा काढून घेतला. यासोबतच त्याने हेदेखील सांगितले की, त्याला या गोष्टीचा अजिबात पश्चाताप होत नाही.
असा निसटला अक्षयच्या हातून सिनेमा
'तारे जमीन पर' २००७ साली रिलीज झाला होता. आमिर खानने त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन तर केलेच पण त्यात अभिनयही केला. पण अमोल गुप्तेने स्क्रिप्ट लिहिली तेव्हा त्याच्या मनात नायक म्हणून अक्षय खन्नाचं नाव होतं. अक्षयला तो थेट ओळखत नसल्याने त्याने आमिरच्या माध्यमातून त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण आमिरने स्वतःच अभिनय करायचे ठरविले. याबाबत अक्षय खन्नाने 'मिड डे'ला सांगितले होते की, 'तो आमिरचा मित्र असल्यामुळे त्यांनी आमिरशी संपर्क साधला आणि म्हणाले, मला ही कथा अक्षयला सांगायची आहे. मी त्याला ओळखत नाही, पण तू नुकतेच त्याच्यासोबत 'दिल चाहता है'मध्ये काम केले आहेस, त्यामुळे तू त्याला फोन करून सांगू शकतोस की मला त्याच्याशी स्क्रिप्ट वाचून दाखवायची आहे?' अक्षय पुढे म्हणाला, 'आमिरने त्याला सांगितले की, जोपर्यंत मी स्क्रिप्ट ऐकत नाही तोपर्यंत मी त्याची शिफारस करू शकत नाही. तर आधी मला सांग आणि मला आवडलं तर मी अक्षयला सांगेन. आमिरला ही स्क्रिप्ट इतकी आवडली की त्यानेच तो चित्रपट केला.
आमिर म्हणाला...
त्यानंतर अक्षय खन्नाने सांगितले की कसे एकदा आमिरने त्याला सांगितले की अमोल गुप्ते त्याच्यासाठी एक चित्रपट बनवत होते, पण त्यानेच तो चित्रपट केला. अक्षय म्हणाला होता, 'एक दिवस मी स्टुडिओत शूटिंग करत होतो, मला आठवत नाही, कदाचित मेहबूब असेल. आमिरही एका चित्रपटाचे शूटिंग करत होता, म्हणून मी त्याच्या व्हॅनमध्ये फक्त हाय म्हणायला गेलो. मग तो म्हणाला तुला माहित आहे काय, हे झालं, आणि मी त्यांना तुझ्याकडे येऊ दिलं नाही आणि मी स्वतः चित्रपट बनवला. तर मी म्हणालो ठीक आहे काही हरकत नाही.