आलिया भटच्या आजोबांचं ९३ व्या वर्षी निधन, Video शेअर करत म्हणाली, "माझे हिरो..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 01:30 PM2023-06-01T13:30:57+5:302023-06-01T13:32:41+5:30
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचे (Alia Bhat) आजोबा नरेंद्र राजदान (Narendra Razdan) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तब्येत अस्वास्थ्यामुळे त्यांना आयसीयूत दाखल केले गेले. आजोबांच्या निधनाने आलिया भट भावूक झाली असून तिने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नरेंद्र राजदान हे आलिया भटची आई सोनी राजदानचे (Soni Razdan) वडील होते. आलिया भट लहानपणापासूनच त्यांच्या अत्यंत जवळ होती. अनेकदा तिने सोशल मीडियावर आज्जी आजोबांसोबत वेळ घालवतानाचे क्षण शेअर केले आहेत. आलियाने आजोबांसोबतचा काही गोड क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याखाली तिने भावूक कॅप्शन दिलं आहे. ती लिहिते,
" माझे आजोबा. माझे हिरो. वयाच्या ९३ व्या वर्षापर्यंत ते गोल्फ खेळले, काम केरत राहिले, सर्वात मस्त ऑमलेट बनवायचे, छान छान गोष्टी सांगायचे, व्हायोलिन वाजवायचे, राहासोबत खेळले, क्रिकेट, स्केच, आणि कुटुंबावर प्रेम करत राहिले आणि शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्य जगले. मला आज जितकं दु:ख होतंय तितकाच आनंदही होतोय. कारण माझ्या आजोबांनी कायम आनंद वाटला आणि माझं भाग्य की मी त्यांचं प्रेम अनुभवत मोठी झाले. परत भेटू."
आजोबा रुग्णालयात असल्याने आलिया भट यावेळी आयफा पुरस्कार सोहळ्याला गेली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ती आजोबांजवळ होती. तिचं आज्जी आजोबांवर खूप प्रेम होतं जे वेळोवेळी तिच्या पोस्टमधून दिसलं. सोनी राजदान यांनी देखील पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं आहे.