भावाबहिणीच्या अतूट नात्यावर आधारित आलिया भटचा 'जिगरा' रिलीज, सिनेमा का बघावा? वाचा वैशिष्ट्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 06:00 AM2024-10-11T06:00:00+5:302024-10-11T06:00:02+5:30
आलिया भट- द हिरो! भावाच्या रक्षणासाठी बहिणीची कोणत्याही थराला जाण्याची तयारी, का बघावा सिनेमा?
आलिया भट (Alia Bhatt) आणि वेदांग रैना (Vedang Raina) यांची मुख्य भूमिका असलेला 'जिगरा' आज प्रदर्शित झाला आहे. आलियाने करण जोहरसोबत मिळून सिनेमाची निर्मितीही केली आहे. भाऊ बहिणीच्या नात्यावर सिनेमा आधारित आहे. परदेशातील तुरुंगात कैद असलेल्या आपल्या भावाला सोडवण्यासाठी बहीण कोणत्याही थराला जाऊ शकते अशी ही गोष्ट आहे. आलिया भटने सिनेमात 'सत्या' ही भूमिका साकारली आहे तर अभिनेता वैदांग रैनाने तिच्या भावाची 'अंकुर'ची भूमिका निभावली आहे. सिनेमाची काही ठळक वैशिष्ट्ये वाचा.
आलिया भट - द हिरो!
'पुष्पा', 'रॉकी' च्या या जगात आलिया भट सुद्धा 'हिरो' पेक्षा कमी नाही. संपूर्ण सिनेमा तिने एकटीने आपल्या खांद्यावर घेऊन तिने सुपरहिट केला आहे. मग ते 'गंगुबाई काठियावाडी' असो किंवा 'राजी', 'डार्लिंग्स' हे चित्रपट असो या सर्वच सिनेमात तिचं टॅलेंट समोर आलं आहे. आलिया आपल्या प्रत्येक सिनेमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे.
भावा बहिणीचं अतूट नातं
सध्या बॉलिवूडमध्ये एकतर अॅक्शन, ऐतिहासिक किंव हॉरर चित्रपट भेटीला येत आहेत. या सगळ्यात भावाबहिणीच्या सुंदर नात्यावर कित्येक वर्षात सिनेमाच आलेला नाही. 'दिल धडकने दो' सिनेमात शेवटचं हे भावा बहिणीचं खास नातं पाहायला मिळालं. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये या नात्यावरचे अनेक सिनेमे गाजले. मग ते 'हरे राम हरे कृष्णा'ते 'जोश','दिल धडकने दो' हे सिनेमे या नात्याला ग्लोरिफाय करणारे होते. आता आलियाच्या या सिनेमाने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये भावा बहिणीच्या या नात्याला जीवंत केलं आहे असं म्हणायला हरकत नाही.
मंत्रमुग्ध करणारं संगीत
'जिगरा'चा टीझर, ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच एक गाणं ओठांवर राहतं ते म्हणजे 'फुलो का तारो का सबका कहना है'. झीनत अमान आणि देवानंद यांच्या 'हरे राम हरे कृष्णा' सिनेमातलं हे आयकॉनिक गाणं 'जिगरा' मध्ये रिक्रिएट करण्यात आलं आहे. गाण्याचं हे नवं व्हर्जन ऐकताना खरोखरंच मंत्रमुग्ध व्हायला होतं. अभिनेता वेदांग रैनाने स्वत: हे गाणं गायलं आहे.