आलिया भटला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला अन् सारा अली खानचा झाला जळफळाट; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:07 IST2025-03-27T15:06:27+5:302025-03-27T15:07:00+5:30
सारा अली खानने सांगितलं खरं कारण

आलिया भटला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला अन् सारा अली खानचा झाला जळफळाट; म्हणाली...
आलिया भट (Alia Bhatt) हिंदी इंडस्ट्रीतली सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. प्रोफेशनल आणि वैयक्तिक दोन्ही आयुष्यात तिचं उत्तम सुरु आहे. एकानंतर एक हिट सिनेमे आणि वैयक्तिक आयुष्यात पती आणि गोंडस मुलीसह ती सुखाचा संसारही करत आहे. आलियाचं हे यश पाहून सारा अली खानला (Sara Ali Khan) मात्र इर्षा वाटत आहे. नुकतंच तिने हे बोलून दाखवलं. नक्की काय म्हणाली सारा वाचा.
एनडीटीव्हीच्या एखा इव्हेंटमध्ये सारा अली खानने हजेरी लावली होती. तेव्हा सारा म्हणाली,"मला आलिया भटकडे पाहून इर्षा वाटते. तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा मला वाटलं बापरे हिला पुरस्कार मिळाला. तिला एक मुलगीही आहे. हिचं आयुष्य तर मस्त सेट आहे."
ती पुढे म्हणाली, "आलियाच्या प्रेरणादायी यशावर तर सर्वांचंच लक्ष गेलं मात्र यामागे तिची मेहनतही खूप होती. तिला काय काय सहन करावं लागलं असेल याची मला कल्पना नाही. अभिनेत्री म्हणून मी खूप अमानवीय विचार केला. आपल्याला माहित नाही पण तिलाही आव्हानं आणि निराशेचा सामना करावा लागला असेलच. तेव्हा कुठे ती या स्टेजला पोहोचली आहे. कारण नाण्याच्या दोन बाजू असतात."
आलिया भटचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा २०२२ साली आला होता. त्याच वर्षी तिचं लग्नही झालं आणि त्याच वर्षी तिला मुलगीही झाली. २०२३ साली तिला या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.