सोनी राजदान सांगतायेत, लोक मला देशद्रोही बोलत असल्याने पाकिस्तानमध्ये मी जास्त खूश राहीन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 01:02 PM2019-04-02T13:02:23+5:302019-04-02T13:08:05+5:30
नो फादर्स इन काश्मीर या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी दिलेल्या मुलाखतीत आजच्या काश्मीरच्या परिस्थितीवर देखील भाष्य केले आहे.
सोनी राजदान यांचा नो फादर्स इन काश्मीर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. सोनी यांची मुलगी आलिया भट सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने त्यांच्या मुलाखतीत तिच्याविषयीच अनेक प्रश्न विचारले जात आहेत आणि त्या देखील आनंदाने आपल्या मुलीविषयी भरभरून बोलत आहेत.
नो फादर्स इन काश्मीर या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आजच्या काश्मीरच्या परिस्थितीवर देखील भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या आहेत की, आपण तांत्रिकदृष्ट्या प्रचंड प्रगती करत आहोत. पण दुसरीकडे आपण खूपच संकुचित विचार करायला लागलो आहोत. आजकाल आपण केवळ जात, धर्म याच्याविषयीच बोलत आहोत. काश्मीरमधून पंडित लोकांनी पळ काढल्यानंतर तर तिथल्या लोकांचे विचार खूपच संकुचित झाले आहेत. भारताला पूर्णपणे हिंदू देश बनवण्यास माझा पूर्णपणे विरोध आहे. पाकिस्तामध्ये सर्व धर्म एकत्र नसल्यानेच त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. पण भारताचे हे वैशिष्ट्य आहे की, सर्व जाती धर्मातील लोक येथे एकत्र नांदतात. कोणी देशातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवले तर त्यांना देशद्रोही बोलले जाते. मला देखील अनेक वेळा देशद्रोही बोलले गेले आहे. माझे माझ्या देशावर प्रचंड प्रेम आहे. देशाच्या प्रगतीसाठी आपल्या देशातील उणिवा काय आहेत हे देखील माहीत असणे गरजेचे आहे. मी देशद्रोही असून मी पाकिस्तानात निघून गेले पाहिजे असे मला अनेकवेळा बोलले जाते. मला अशा गोष्टींचा फरक पडत नाही. कारण माझ्यासारखेच अनेकांचे देखील मत आहे. पण कधी कधी मला वाटते की, पाकिस्तानातच निघून जायला पाहिजे. तिथे जेवण पण खूप चांगले मिळते. तिथे मी खूश देखील राहीन.
पाकिस्तानमध्ये जाऊन तुम्ही जास्त खूश व्हाल असे तुम्ही आता म्हणत आहात त्यावर तुम्हाला ट्रोल केले जाईल असे नवभारत टाईम्सने त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, लोकांनीच ट्रोल करून मला पाकिस्तानाला जायला सांगितले आहे. त्यामुळे मी पाकिस्तानमध्ये जाईन. मी केवळ काही दिवस फिरण्यासाठी तिथे जाईन.