‘सडक 2’च्या ट्रेलरवर 50 लाख 'डिसलाईक्स'; 'नेपोटिझम' प्रकरणाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 11:06 AM2020-08-13T11:06:20+5:302020-08-13T11:10:06+5:30
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिजमचा मुद्दा ऐरणीवर आला आणि बघता बघता स्टार किड्स नेटक-यांच्या निशाण्यावर आलेत.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिजमचा मुद्दा ऐरणीवर आला आणि बघता बघता स्टार किड्स नेटक-यांच्या निशाण्यावर आलेत. महेश भटची लाडकी लेक आलिया भट हिला तर नेटक-यांनी जाम फैलावर घेतले. केवळ तिलाच नाही तर तिचा आगामी सिनेमा ‘सडक 2’च्या ट्रेलरलाही नेटक-यांनी लक्ष्य केले. तूर्तास आलियाच्या या सिनेमाच्या ट्रेलरवर डिसलाईकचा भडीमार होताना दिसतोय.
11 ऑगस्टला ‘सडक 2’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला आत्तापर्यंत 2 लाख 84 हजार लाईक्स मिळाले आहेत. तर डिसलाईक्सची संख्या 50 लाखांच्या घरात आहेत. ‘सडक 2’चे पोस्टर रिलीज होताच नेटक-यांनी या सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी लावून धरली होती. त्याचा फटका या सिनेमाच्या ट्रेलरलाही बसल्याचे दिसतेय.
‘सडक 2’ या सिनेमात आलिया भट, आदित्य राय कपूर, पूजा भट, संजय दत्त प्रमुख भूमिकेत आहेत. आलियाचे पापा महेश भट यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने महेश भट तब्बल 20 वर्षांनंतर दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरले आहेत. हा सिनेमा ‘सडक’ या सिनेमाचा सीक्वल आहे. खरे तर ‘सडक’च्या सीक्वलची घोषणा झाली, त्यावेळी चाहते प्रचंड उत्सुक होते. पण सुशांतच्या मृत्यूनंतर सुरु झालेल्या नेपोटिजमच्या वादाने एकूण चित्रच बदलले.
ट्रेलरमध्ये आलिया आर्याच्या भूमिकेत आहे. आलिया आणि आदित्य यांचा लव्ह अँगल ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. संजय दत्त रवी नावाच्या ट्रॅव्हल एजंटची भूमिका साकारताना आहे. या सिनेमात जिशु सेनगुप्ता, मकरंद देशपांडे, गुलशन ग्रोव्हर, प्रियांका बोस, मोहन कपूर आणि अक्षय आनंद यांच्याही भूमिका आहेत.