'चोली के पिछे' रिमिक्सवर भडकल्या अलका याज्ञिक; म्हणाल्या, 'लता-आशाजींचीही गाणी...'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 01:57 PM2024-04-10T13:57:18+5:302024-04-10T13:57:39+5:30
'नंतर म्हणतात गाणं हिट आहे. अरे ते हिटच होतं'; अलका याज्ञिक यांनी व्यक्त केली मनातली खदखद
जुन्या हिट गाण्यांचं रिमिक्स करणं हा आता ट्रेंडच बनला आहे. करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेननचा नुकताच आलेला 'क्रू' सिनेमा. यामध्येही 'चोली के पिछे' गाण्याचं रिमिक्स केलं आहे. 'चोली के पिछे' हे गाणं तेव्हाचं अतिशय सुपरहिट गाणं होतं. 'खलनायक' सिनेमातील हे गाणं अलका याज्ञिक आणि इला अरुण यांनी गाणं गायलं होतं. तर माधुरी दीक्षितचा गाण्यावरील डान्स गाजला होता. या गाण्याला पुन्हा अशा पद्धतीने रिलीज केल्यावर नुकतंच इला अरुण यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता अलका याज्ञिक यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अलज्ञा याज्ञिक म्हणाल्या, "काय बोलू मी? ते गाणं खूप गाजलं होतं. आधीही वाजायचं आजही वाजतं. मी म्हणलं ठिक आहे आमचं गाणं आहे, आमच्याच आवाजात रिमिक्स आहे, वाजतंय तर वाजवू द्या..चांगलंच आहे. हे एक हिट गाणं आहे त्यात रॅप वगरे टाकलंय..ठीक आहे यार. हा जमानाच रिमिक्सचा आहे."
मनातली खदखद व्यक्त करताना त्या पुढे म्हणाल्या, "संगीत कंपोझर आजकाल नवं काही करत नाहीत. फक्त रिदम बदलत आहेत आणि मध्ये रॅप टाकत आहेत. नंतर म्हणतात गाणं हिट आहे. अरे ते हिटच होतं. पण लता दीदी, आशाजींची गाणी जेव्हा उचलतात, त्या काळातील गाण्यांची जेव्हा अशी वाट लावतात तेव्हा खूप दु:ख होतं.