बॉलिवूड नाही टॉलिवूड NO. 1!! ‘पुष्पा’ने धुमाकूळ घातला अन् टॉलिवूडनं पहिला नंबर पटकावला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 06:05 PM2022-01-05T18:05:28+5:302022-01-05T18:06:27+5:30
Tollywood cinema industry beats Bollywood: आत्तापर्यंत बॉलिवूड हीच देशातील नंबर 1 ची फिल्म इंडस्ट्री होती. पण आता बॉलिवूड तिसऱ्या क्रमांकावर गेलं आहे. जाणून घ्या दुसऱ्या नंबरवर कोण?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa) या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. केवळ साऊथचं नाही तर उत्तर भारतातही या सिनेमावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. अल्लूचा हा सिनेमा हिंदीतही रिलीज झाला आणि हिंदी सिनेप्रेमींनी तो डोक्यावर घेतला. जगभरातही या सिनेमाने 300 कोटींवर गल्ला जमवला आहे. एकंदर काय सगळीकडे ‘पुष्पा’ची हवा आहे.
एकीकडे बॉलिवूड स्टार रणवीर सिंगचा ‘83’कडे प्रेक्षक फिरकले नाहीत. यासाठी कोरोना महामारीचं कारण दिलं गेलं. पण कोरोना काळातही अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ने मात्र बक्कळ कमाई केली. तसही गेलं वर्ष साऊथच्या सिनेमांनीच गाजवलं, असं म्हणायला हरकत नाही. टॉलिवूड (Tollywood) सिने इंडस्ट्रीत गेल्या वर्षी वकील साब, उपेन्ना, अखंडा यासारखे सिनेमे आलेत आणि हिट झालेत. कॉलिवूडमध्येही मास्टर सारखा सिनेमा छप्परफाड कमाई करून गेला आणि या सगळ्यांत बॉलिवूड (Bollywood) पिछाडलं.
टॉलिवूड नंबर 1, 2021 मध्ये 1300 कोटींची कमाई
रिपोर्टनुसार, 2021 मध्ये टॉलिवूडच्या सिनेमांनी वर्ल्ड वाईड सुमारे 1300 कोटींची कामई केली आणि यासोबतच टॉलिवूड देशाची नंबर 1 फिल्म इंडस्ट्री बनली. कॉलिवूड दुसऱ्या क्रमांकाची सिने इंडस्ट्री ठरली. कॉलिवूडमध्ये धनुषच्या असुरन, कर्णन, मास्टर, जय भीम या सिनेमांनी विक्रमी कमाई केली.
Global BoxOffice Collections of Tollywood Films Released In 2021 has Crossed ₹1300 Cr.
— AndhraBoxOffice.Com (@AndhraBoxOffice) January 3, 2022
This is for the 1st Time in History that Tollywood has emerged as No.1 Indian Film Industry!
Kollywood has come in at 2nd and Bollywood with ₹700 Cr is at 3rd! pic.twitter.com/uhTjPWx8qK
बॉलिवूड नंबर 3 वर
आत्तापर्यंत बॉलिवूड हीच देशातील नंबर 1 ची फिल्म इंडस्ट्री होती. पण आता बॉलिवूड तिसऱ्या क्रमांकावर गेलं आहे. आंध्र प्रदेश बॉक्स ऑफिस सोशल मीडिया हँडलनुसार, 2021 मध्ये बॉलिवूडने एकूण 700 कोटींची कमाई केली. 2021 मध्ये अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ सुपरहिट ठरला. मात्र अंतिम, सत्यमेव जयते 2, चंदीगड करे आशिकी यासारखे मोठे सिनेमे फार कमाल दाखवू श्कले नाहीत. रणवीर सिंगच्या ‘83’ या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण या सिनेमाला प्रेक्षकांनी फार प्रतिसाद दिला नाही. कोरोना महामारीचा बॉलिवूडला मोठा फटका बसला आहे आणि निश्चित हे आकडे बॉलिवूडकरांचं टेन्शन वाढवणारे आहेत.
टॉलिवूड, कॉलिवूड, बॉलिवूड म्हणजे काय?
तेलगू सिने इंडस्ट्रीला टॉलिवूड म्हटलं जातं. याआधी बंगाली सिनेमासाठीही हा शब्द वापरला जायचा. पण आता तेलगू सिनेमांची लोकप्रियता बघता, तेलगू सिने इंडस्ट्रीसाठीच हा शब्द प्रामुख्यानं वापरला जातो.
कॉलिवूड हे नाव तामिळ सिनेमांसाठी वापरलं जातं. तामिळनाडूच्या कोडम्बकमपासून हे नाव प्रेरित आहे. जी तामिळ फिल्म इंडस्ट्रीसाठी बेस्ट जागा मानली जाते.
बॉलिवूड म्हणजे हिंदी सिनेमा. बॉम्बे (मुंबई) मुळे या इंडस्ट्रीचं नाव बॉलिवूड पडलं. याशिवाय मल्याळम चित्रपटांसाठी मॉलिवूड तर कन्नड सिने इंडस्ट्रीला सेंडलवूड हे नाव आहे.