Amazon Rainforest Fire: ‘अॅमेझॉन’साठी एकवटले बॉलिवूड; अनुष्का, विराट, अर्जुनने व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 02:12 PM2019-08-22T14:12:13+5:302019-08-22T14:14:16+5:30
Amazon Rainforest Fire: गुढ रहस्यांनी भरलेले अॅमेझॉनचे जंगल नेहमी जगाला खुणावत आले आहे. जगाच्या पाठीवर क्चचित आढळेल अशी जैवविविधता असलेल्या या जगातील सर्वात मोठ्या सदाहरित जंगलाच्या चिंतेने सध्या बॉलिवूडकरांना ग्रासले आहे.
गुढ रहस्यांनी भरलेले अॅमेझॉनचे जंगल नेहमी जगाला खुणावत आले आहे. जगाच्या पाठीवर क्चचित आढळेल अशी जैवविविधता असलेल्या या जगातील सर्वात मोठ्या सदाहरित जंगलाच्या चिंतेने सध्या बॉलिवूडकरांना ग्रासले आहे. होय, या जंगलात लागलेली भीषण आग हे यामागचे कारण आहे. खरे तर याआधीही या जंगलात आगीच्या घटना घडल्या आहेत. पण सध्याची आग इतकी भीषण आहे की, ब्राझिलचे साओ पाउलो धुरामुळे अंधारात डुंबले आहे. अवकाशातूनही धूर दिसतो आहे.
अॅमेझॉनचे जंगल हे जगातील सर्वात मोठे वर्षावन आहे. ते मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेते आणि ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव कमी करते. मात्र सध्या हे वर्षावन आगीने धुमसतंय. यामुळेच ट्विटरवर #PrayForTheAmazonहा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेक बॉलिवूड स्टार्सनेही अॅमेझॉनमधील आगीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांनी अॅमेझॉनमधील आगीचा फोटो शेअर करत, चिंता व्यक्त केली आहे. ‘अॅमेझॉनचे जंगन आठवडाभरापासून आगीने धुमसते आहे. ही धडकी भरवणारी बातमी आहे. मीडियाने याकडे लक्ष देईल, अशी आशा आहे,’ असे त्यांनी लिहिले आहे.
अभिनेता अर्जुन कपूर यानेही ट्विट केले आहे. ‘अॅमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये आग... याचा जगाच्या पर्यावरणावर काय परिणाम होईल, याचा विचारही करवत नाही. अतिशय दु:खद,’ असे त्याने लिहिले आहे.
दिशा पाटनी हिने यानिमित्ताने मीडियावर आगपाखड केली आहे. गेल्या 16 दिवसांपासून अॅमेझॉनचे जंगलात भीषण आग लागली अहे. मीडियाचे याकडे लक्ष का नाही? असा सवाल तिने केला आहे.
गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यापर्यंत या जंगलात ३९, ७५९ आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूड फॉर स्पेस रिसर्चने यावर चिंता व्यक्त केली होती. अॅमेझॉनच्या जंगलात आगीचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले होते. अॅमेझॉन वर्षावनाचा सर्वाधिक भाग हा बाझील देशात आहे त्यानंतर पेरू, कोलंबिया, व्हेनेज्युएला, इक्वेडोअर, बोलिविया सुरूनेम यांसारख्या देशांत या वर्षावनाचा भाग आहे.