कर्ज फेडण्यासाठी निर्मात्याने बनवलेला चित्रपट झाला सुपरहिट, ४५ वर्षांपूर्वी ब्लॉकबस्टर ठरलेला सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 05:03 PM2023-11-16T17:03:54+5:302023-11-16T17:08:21+5:30
हा सिनेमा फक्त 7 लाख रूपयांत बनून तयार झाला होता आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 7 कोटींची बक्कळ कमाई केली होती.
अमिताभ बच्चन, जीनत अमान, हेलन आणि प्राण स्टारर ‘डॉन’ या चित्रपटाच्या रिलीजला आज 45 वर्षे पूर्ण झालीत. 1978 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक होते चंद्रा बरोट आणि निर्माते होते नरीमन इराणी. हा सिनेमा फक्त 7 लाख रूपयांत बनून तयार झाला होता आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 7 कोटींची बक्कळ कमाई केली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की निर्मात्याने केवळ कर्ज फेडण्यासाठी हा चित्रपट तयार केला होता.
खरं तर नरिमन इराणी यांनी 'जिंदगी जिंदगी' नावाचा चित्रपट केला होता, जो बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला होता. हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे नरिमन इराणी यांच्यावर 12 लाखांचे कर्ज झाले होते. यानंतर सलीम-जावेद जोडीने लिहिलेल्या 'डॉन'ची स्क्रिप्ट त्यांना मिळाली. त्यानंतर नरिमन इराणी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत हा चित्रपट केला, जो अभिनेत्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरला.
निर्माते नरिमन इराणी यांना आशा होती की, 'डॉन' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगले पैसे कमवेल आणि मग ते त्यांच्या सर्व कर्जातून मुक्त होतील. पण दुर्दैवाने 'डॉन'च्या शूटिंगदरम्यान नरिमन इराणी यांचा मृत्यू झाला. शूटिंगदरम्यान ढगफुटीमुळे त्यांच्यावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला होता. पण टीमने पूर्ण झोकून देऊन चित्रपट पूर्ण केला. याचे दिग्दर्शन चंद्रा बारोट यांनी केले होते.
‘डॉन’ सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले. पण हा सिनेमा अनेक सुपरस्टार्सनी नाकारला होता. धर्मेन्द्र, जितेन्द्र व देव आनंद यांना या सिनेमाची स्टोरी ऐकवल्यावर त्यांनी तो करण्यास नकार दिला होता.