कोरोनाच्या संकटात खंबीर राहण्याचं अमिताभ बच्चन यांनी केलं लोकांना आवाहन, म्हणाले - 'रुके ना तू...'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 04:48 PM2021-05-12T16:48:19+5:302021-05-12T16:48:45+5:30
कोरोनाच्या कठीण काळात लोकांना धैर्य द्यायला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुढे सरसावले आहेत.
देशभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. आतापर्यंत अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रुग्णालयात बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. लोक अक्षरशः हवालदिल झाले आहेत. या कठीण काळात लोकांना धैर्य द्यायला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुढे सरसावले आहेत. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी दिल्लीत २ कोटी रुपये दान केले आहेत आणि आता ते लोकांना या संकटात एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते प्रसून जोशी यांची कविता रुके ना तू सादर करत लोकांना या संकटासमोर हार मानू नका असे सांगत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, रुके ना तू, एकत्रित येऊन आपण लढू आणि जिंकू.
यापूर्वीही अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी होपवर एक कविता ऐकवली आहे. जी या संकटात लोकांना एकत्रित येण्यासाठी प्रेरीत करते.
अमिताभ बच्चन यांनी दिल्लीतील रकाब गंज गुरुद्वारामध्ये कोविड केअर सेंटर बनवण्यासाठी दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. ३०० बेड्स असलेल्या या कोविड सेंटरचं नावं 'श्री गुरु तेग बहादुर कोविड केअर फॅसिलिटी' असं ठेवण्यात आलं आहे. या कोविड केअर फॅसिलिटीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी डॉक्टर, पॅरामेडिक्स यांच्यासह अॅम्ब्युलन्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स इत्यादी सुविधांची व्यवस्था असणार आहे.