झुंड: 'त्या' मुलाच्या प्रश्नामुळे हादरले होते बिग बी; सांगितला सुन्न करणारा प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 15:42 IST2022-03-10T15:41:41+5:302022-03-10T15:42:50+5:30
Amitabh bachchan: अलिकडेच बिग बींनी या चित्रपटानिमित्त एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी चित्रीकरणादरम्यान घडलेला किस्सा सांगितला.

झुंड: 'त्या' मुलाच्या प्रश्नामुळे हादरले होते बिग बी; सांगितला सुन्न करणारा प्रसंग
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule)यांचा 'झुंड' (Jhund) हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटावर सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. झुंडमध्ये अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली असून त्यांच्यासोबत काही नॉन ग्लॅमरस चेहरेदेखील झळकले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातील एका कलाकाराने बिग बींना चित्रीकरणादरम्यान एक प्रश्न विचारला होता. हा प्रश्न ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन सुन्न झाले होते. याविषयी त्यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितलं आहे.
अलिकडेच बिग बींनी या चित्रपटानिमित्त एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी चित्रीकरणादरम्यान घडलेला किस्सा सांगितला. पण, हा प्रसंग त्यांना सुन्न करणारा होता.
"या चित्रपटात एक इमोशनल सीन शूट केला जात होता. त्यावेळी सगळ्या मुलांच्या डोळ्यात अश्रू तरळणं गरजेचं होतं. मात्र, त्याचवेळी एक मुलगा माझ्या जवळ आला आणि, सर, रडायचं कसं? असा प्रश्न त्याने विचारला. त्याच्या या प्रश्नात एक वेगळंच दु:ख होतं. त्यातत वेदना होत्या", असं बिग बी म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "रडणं कसं असतं या गोष्टीचाच त्या मुलाला विसर पडला होता. तो इतक्या हालाखीच्या परिस्थिीत लहानाचा मोठा झाला होता की त्याच्यासाठी रडणं त्याला फारसं पुरेसं नव्हतं. त्याच्यासमोर रडणं ही फार लहान गोष्ट झाली होती. त्यामुळे दु:ख मांडण्यासाठी रडणं त्याला पुरेसं नाही, या विचारानेच मला हादरायला झालं. आजही त्या मुलाचा प्रश्न माझ्या जसाच्या तसा लक्षात आहे."
दरम्यान, 'झुंड' हा चित्रपट सत्य कथेवर आधारित आहे. या चित्रपटातून फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची कथा उलगडली गेली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, सोमनाथ अवघडे, अरबाज शेख, तानाजी गालगुंडसोबत ही तरुण कलाकार मंडळी झळकली आहेत.