अमिताभ बच्चन यांना झालेला 'हा' गंभीर आजार, म्हणाले, "मला चालता येत नव्हतं, माझे डोळे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 04:39 PM2023-10-19T16:39:28+5:302023-10-19T16:41:06+5:30
अमिताभ बच्चन यांनी केलेला गंभीर आजाराचा सामना, शेअर केला अनुभव, म्हणाले...
छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' हा लोकप्रिय शो आहे. काही दिवसांपूर्वीच या शोचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं. गेली कित्येक वर्ष बिग बी अमिताभ बच्चन या शोचं सूत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये सर्वसामान्य व्यक्तींना काही प्रश्नांची अचूक उत्तरं देत कोट्यधीश होण्याची संधी मिळते. हॉटसीटवर बसलेल्या व्यक्तीशी गप्पा मारताना अनेकदा बिग बी त्यांच्या आयुष्यातील प्रसंगही शेअर करतात. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितला.
'कौन बनेगा करोडपती'च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात स्पर्धक श्रीदेव सहभागी झाले होते. त्यांनी त्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, "जेव्हा व्यक्तीला जन्मापासूनच व्यंधत्व असतं तेव्हा त्याला माहीत असतं की आपल्याला कोणाच्या तरी सहाय्याची गरज असणार आहे. पण, माझ्यासारख्या व्यक्तींना काही अपघात घडल्यानंतर व्यंधत्व येतं. यामुळे मी नैराश्यात गेलो होतो. माझी पत्नी जया आणि कुटुंबीयांनी मला यातून बाहेर काढलं. जयाने माझा खूप चांगल्याप्रकारे सांभाळ केला."
श्रीदेव यांचा हा प्रसंग ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग शेअर केला. "एकदा चित्रिकरणादरम्यान मी सेटवर पडलो होतो. मला मायस्थेनिया ग्रेविस हा गंभीर आजार झाला होता. हा एक मसल्स डिसऑर्डरचा आजार आहे. मला पानीही पिता येत नव्हतं. माझ्या शर्टचे बटणही मला लावता येत नव्हते. माझे डोळेही मला बंद करता येत नव्हते. डॉक्टरांनी औषध दिल्यानंतर मी घरी आलो. पण, मी चित्रपटात काम कसं करू शकेन, याची चिंता मला सतावत होती. कारण, मला नीट चालताही येत नव्हतं," असं बिग बी म्हणाले.
पुढे अमिताभ म्हणाले की तेव्हा मनमोहन देसाई माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, "चिंता करू नकोस. मी तुला व्हिलचेअरवर बसवून एखादी भूमिका देईन." जेव्हा कोणी सकारात्मकता दाखवतं. तेव्हा या गोष्टींची खूप मदत होते,असंही बिग बींनी सांगितलं.