ना प्रसिद्धी, ना गाजावाजा! अमिताभ बच्चन यांनी कोरोना काळात केलेली ‘ही’ मदत पाहून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:59 AM2021-05-11T10:59:43+5:302021-05-11T11:01:18+5:30
कोरोना काळात कुठलेही योगदान दिले नाही, काहीही मदत केली नाही, असा आरोप करत लोक अमिताभ यांना ट्रोल करत आहेत. आता या ट्रोलर्सला अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे उत्तर दिले आहे.
भारतात कोरोनाच्या दुस-या लाटेने लाखो लोकांना प्रभावित केले आहे. या भीषण परिस्थितीत मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचा यात आवर्जुन उल्लेख करावा लागेल. काही सेलिब्रिटी गाजवाजा न करता लोकांची मदत करत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्यापैकीच एक. (Amitabh Bachchan contributed to covid 19 relief)
कोरोना काळात मदत केली नाही, म्हणून अमिताभ यांना लोक ट्रोल करतात. याआधी कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा ‘दानधर्म का करत नाही?’, असा थेट सवाल करत ट्रोलर्सनी त्यांचा पिच्छा पुरवला होता. त्यांना अनेकांनी नको ते ऐकवले होते. आता दुस-या लाटेने देशात भीषण स्थिती उद्भवली असतानाही अमिताभ यांना ट्रोलिंग सहन करावे लागतेय. कोरोना काळात अमिताभ यांनी कुठलेही योगदान दिले नाही, काहीही मदत केली नाही, असा आरोप करत लोक त्यांना ट्रोल करत आहेत. या ट्रोलर्सला आता अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे उत्तर दिले आहे.
हो, मी चॅरिटी करतो पण...
बीग बी यांनी ब्लॉगमध्ये लिहिले, ‘हो, मी चॅरिटी करतो. पण याचा गाजावजा करण्यावर माझा विश्वास नाही. गेल्या काही वर्षांत आमच्या कुटुंबाने जी काही चॅरिटी केली, ते चूपचाप केली. आम्ही ती लपवून ठेवली. सोशल मीडियावर त्याबद्दल गोंगाट टाळला. आम्ही ज्यांना मदत केली, तेच याबद्दल जाणतात. आम्ही आमच्या खर्चाने 1500 शेतक-यांचे कर्ज माफ केलीत. अभिषेक व श्वेताने पुलवामा हल्ल्यात शहिद कुटुंबांना मदत केली, गेल्यावर्षी सुमारे 4 लाख लोकांना महिनाभर भोजनदान केले आणि आता सुमारे 5 हजार लोकांना दोन्ही वेळचे जेवण पुरवले जातेय. याशिवाय, पोलिस, रूग्णालया आणि फ्रंट लाईन वॉरियर्सला हजारोंच्या संख्येत मास्क, पीपीई किटचे वाटप केले. स्थलांतरित मजूरांना भोजनदान करणा-या शिख कमिटीला देणगी दिली.’
30 बसेस, ट्रेन बुक केली...
पुढे त्यांनी लिहिले, गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये पायपीट करत घरी निघालेल्या स्थलांतरित मजुरांनी शेकडो चप्पल-जोडे पुरवले. 2800 मजुरांसाठी 30 बसगाड्या बुक केल्या. युपीसाठी एक संपूर्ण रेल्वे बुक केली. 3 इंडिगो फ्लाईट बुक केल्यात.
2 मुलांना दत्तक घेतले, डायग्नोस्टिक सेंटर डोनेट केले...
इतकेच नाही अमिताभ यांनी एक पूर्ण डायग्नोस्टिक सेंटर दान केले. सोबत एमआरआय मशीन, सोनोग्राफी स्कॅन दान केले. नुकतीच त्यांनी पालिका रूग्णालयांसाठी 20 वेंटिलेटरची ऑर्डर दिली. यापैकी 10 आज येणार आहेत. कोरोनामुळे अनाथ झालेल्या दोन मुलांना अमिताभ यांनी दत्तक घेतले आहे. ही दोन्ही मुले हैदराबादेतील एका अनाथालयात आहेत. त्यांच्या शालेय शिक्षणाचा आणि खाण्यापिण्याचा खर्च अमिताभ यांनी उचलला आहे, अभ्यासात त्यांची कामगिरी पाहून त्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च उठवण्याचीही त्यांनी तयारी आहे. इतकेच नाही तर श्रीगुरू तेज बहादूर कोव्हिड सेंटरमध्ये त्यांनी 2 कोटी रूपये आणि ऑक्सिजन सिलिंडरही दान केले आहेत.