अमिताभ बच्चन यांना या गोष्टीचा होतोय त्रास... ब्लॉगद्वारे शेअर केली ही गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 06:30 PM2019-07-16T18:30:00+5:302019-07-16T18:30:02+5:30
अमिताभ यांना सध्या एका गोष्टीचा त्रास होत असल्याचे त्यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे त्यांच्या चाहत्यांना सांगितले आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आपल्या भूमिकांनी अनेकदा चाहत्यांना थक्क करतात. सध्या अमिताभ ‘गुलाबो सिताबो’च्या शूटींगमध्ये बिझी आहेत. या चित्रपटातील त्यांच्या लुक्सची चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात बिग बी एका वृद्धाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांचा मेकअप इतका सुंदर करण्यात आलेला आहे की, या चित्रपटातील हे वृद्ध अमिताभच आहेत का असा प्रश्न लोकांना पडत आहे.
अमिताभ यांना या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अनेक तास मेकअपला द्यावे लागत आहेत. या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखेसाठी प्रोस्थेटिक मेकअपचा वापर करण्यात आलेला आहे. याच मेकअपमुळे अमिताभ यांना एक वेगळा लूक मिळालेला आहे. पण याच मेकअपमुळे ते सध्या चिंतेत असल्याचे त्यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे नुकतेच सांगितले आहे. या मेकअपमुळे त्यांना चित्रीकरण करताना खूपच त्रास होत आहे.
याविषयी अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, मी याआधी देखील पा या चित्रपटासाठी प्रोस्थेटिक मेकअप केलेला आहे. त्यामुळे हा मेकअप करण्यासाठी मी कधीच नकार देत नाही. पण हा मेकअप अधिक काळासाठी असल्याने चित्रीकरण संपेपर्यंत मला प्रचंड थकवा येतो. प्रोस्थेटिक मेकअपच्या बाबतीत हॉलिवूडमध्ये काही नियम आहेत. पण ते आपल्याकडे पाळले जात नाहीत. त्यांच्या नियमानुसार या मेकअपचा वापर तीन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी करायचा नसतो. तसेच पुन्हा प्रोस्थेटिक मेकअप करायचा असल्यास एक किंवा दोन दिवसांचा ब्रेक घेतला जातो. पण आपल्याकडे सलगपणे कित्येक महिने चित्रीकरण सुरू असते. मी या सगळ्या गोष्टी लिहून याबाबत तक्रार करत नाहीये. केवळ हा मेकअप सांभाळणे मला खूप कठीण जात असल्याचे सांगत आहे.
अमिताभ यांनी आपल्या लुक्सचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या मेकअपसाठी रोज तीन तास लागतात, असे त्यांनी लिहिले होते. ‘गुलाबो सिताबो’ या सिनेमात अमिताभ यांच्यासोबत आयुष्मान खुरानासुद्धा दिसणार आहे. हा सिनेमा 24 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाची कथा जुही चतुर्वेदीने लिहिली आहे तर रॉनी लहरी आणि शीला कुमार सिनेमाची निर्मिती करणार आहेत. शूजीत सरकार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.