काय आहे अमिताभ बच्चन यांचे खरे नाव? स्वत:च ऐकवला इंटरेस्टिंग किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 12:51 PM2019-10-09T12:51:38+5:302019-10-09T12:52:22+5:30
होय, हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकाने अमिताभ यांना प्रश्न केला आणि या प्रश्नाचे उत्तर देताना अमिताभ यांनी एक इंटरेस्टिंग कहाणी सांगितली.
‘कौन बनेगा करोडपती’ हा शो आणि महानायक अमिताभ बच्चन हे जणू समीकरण झाले आहे. अमिताभ यांनी या शोला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाला प्रश्न विचारण्याची अमिताभ यांची खास स्टाईल, त्यांचा दमदार आवाज प्रेक्षकांना भुरळ घालतो. या शो दरम्यान अमिताभ केवळ स्पर्धकांना प्रश्नच विचारत नाही तर सोबत स्वत:च्या आयुष्यातील वेगवेगळे अनुभवही शेअर करतात. आपल्या खासगी जीवनाशी संबंधित एक असाच खास किस्सा अमिताभ यांनी नुकताच ऐकवला. हा किस्सा कशाबद्दलचा तर अमिताभ यांच्या ‘इन्कलाब’ या नावाबद्दलचा. होय, हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकाने अमिताभ यांना प्रश्न केला आणि या प्रश्नाचे उत्तर देताना अमिताभ यांनी एक इंटरेस्टिंग कहाणी सांगितली.
अमिताभ यांच्या मातोश्री तेजी बच्चन यांनी अमिताभ यांचे ‘इन्कलाब’ असे नामकरण केले होते, असे मानले जाते. याच पार्श्वभूमीवी तुमचे खरे नाव इन्कलाब आहे, हे खरे आहे का? असा प्रश्न संबंधित स्पर्धकाने अमिताभ यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देतानाअमिताभ यांनी सांगितले की, सन 1942 मध्ये गांधींजींचे ‘भारत छोडो आंदोलन’ सुरू होते. आमच्या शहरात या आंदोलनाने जोर पकडला होता. लोक रस्त्यावर उतरुन ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देत होते. माझी आई तेजी बच्चन या आंदोलनान प्रचंड प्रभावित झाली होती.
एक दिवस तिला मोर्चा दिसला आणि ती मोर्चात सहभागी झाली. त्यावेळी मी आईच्या पोटात होतो आणि माझी आई आठ महिन्यांची गर्भवती होती. आई मोर्चात जोरजोरात ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देत होती आणि इकडे घरातील सगळेजण आईला शोधत होते. अखेर ती सापडली. पण आठ महिन्यांची गर्भवती असताना मोर्चात गेल्याबद्दल तिला सगळ्यांनीच धारेवर धरले. ‘तू इन्कलाबची एवढी समर्थक आहेस तर तुझ्या बाळाच्या जन्मानंतर त्याचे नावही इन्कलाब ठेवले जाईल,’असे तिला सगळेजण म्हणाले. आईसोबत घडलेला हा किस्सा जवळजवळ सर्वांनाच माहित असल्याने माझ्या जन्मानंतर खरच माझे नाव इन्कलाब ठेवण्यात आले, असा अनेकांना वाटते. पण असे काहीही नाही. माझे खरे नाव अमिताभ हेच आहे. माझ्या जन्मानंतर माझ्या वडिलांचे एक अतिशय जवळचे मित्र आमच्या घरी आले होते. त्यांनी मला पाहिल आणि माझे अमिताभ असे नामकरण केले होते. त्यामुळे अमिताभ हेच माझे खरे नाव आहे.