सत्यजीत रे यांच्यासोबत काम करण्याची संधी न मिळाल्याचा आजही होतो अमिताभ बच्चन यांना पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 11:47 AM2019-04-23T11:47:14+5:302019-04-23T11:49:14+5:30
अमिताभ बच्चन यांना सत्यजीत रे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही याचे दुःख त्यांना आजही होते.
सत्यजीत रे यांनी एक निर्माते, लेखक, संगीतकार, ग्राफिक डिझायनर, गीतकार अशी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा जन्म कलकत्यामधील एका बंगाली कुटुंबात झाला. रे यांनी 36 चित्रपट दिग्दर्शित केले होते, त्याचसोबत त्यांनी अनेक डॉक्युमेंट्री देखील बनवल्या. रे यांचा जन्म 2 मे 1921 ला झाला होता तर त्यांचे निधन 23 एप्रिल 1992 ला बंगालमध्ये झाले. त्यांच्या पाथेर पंचाली या चित्रपटाचे आजही कौतुक केले जाते. या चित्रपटाला केवळ भारतातच नव्हे तर जगभर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
पाथेर पांचाली या चित्रपटाला एकूण 11 पुरस्कार मिळाले होते. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला बेस्ट ह्युमन डॉक्युमेंट या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. सत्यजीज रे यांचा हा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी अपराजितो, अपून संसार यांसारखे अनेक दर्जेदार चित्रपट चित्रपटसृष्टीला दिले. सत्यजीत रे यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास हा सोपा नव्हता. ते केवळ तीन वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या आईने प्रचंड कष्ट करून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि पुढील शिक्षणासाठी ते शांती निकेतनला गेले. पण 1943 मध्ये ते कोलकत्त्याला परतले आणि ग्राफिक डिझायनर म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली.
1950 मध्ये त्यांना लंडनला जायची संधी मिळाली होती. तिथे त्यांनी अनेक चित्रपट पाहिले. बायसिकल थिव्स हा चित्रपट त्यांना प्रचंड भावला. या चित्रपटाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की, त्यांनी पाथेर पांचाली हा चित्रपट बनवण्याचे ठरवले. हा त्यांचा चित्रपट प्रसिद्ध लेखक बंधोपाध्याय यांच्या पुस्तकावर आधारित होता. या चित्रपटाची त्यांची सगळीच टीम खूपच नवीन होती. या चित्रपटासाठी त्यांना प्रचंड आर्थिक चणचण लाभली होती. पण हा चित्रपट बनवण्यासाठी बंगाल सरकारने त्यांना मदत केली.
अमिताभ बच्चन यांना सत्यजीत रे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही याचे दुःख त्यांना आजही होते. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात त्यांनी ही गोष्ट सगळ्यांना सांगितली होती.