अमिताभ बच्चन यांच्यावर झाला होता शीखविरोधी असल्याचा आरोप; १० वर्षांपूर्वीचं 'ते' पत्र होतंय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 01:52 PM2021-05-21T13:52:34+5:302021-05-21T13:53:29+5:30
बिग बींवर १९८४ सालच्या शीख हत्याकांडाला चिथावणी दिल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र त्यांनी १० वर्षांपूर्वी या प्रकरणावर पत्र लिहून त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते.
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. नुकतेच त्यांनी दिल्लीतील गुरूद्वारा रकब गंज साहिब येथे कोरोना केअर सेंटर उभारण्यासाठी २ कोटींची मदत केली होती. सुरुवातीला त्यांच्याकडून ही मदत घेण्यास अनेकांनी नकार दिला होता. कारण त्यांच्यावर १९८४ साली राजीव गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीला चिथावणी दिल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र अमिताभ बच्चन यांनी दहा वर्षांपूर्वी या संपूर्ण प्रकरणावर पत्र लिहून त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. आता बिग बींचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी २०११ साली अकाल तख्त साहिबच्या जत्थेदारांना हे पत्र पाठवले होते. यामध्ये त्यांनी त्यांच्यावर केले जाणारे आरोप फेटाळून लावले होते. त्यात त्यांनी लिहिले होते की, मी कधीही राजीव गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीलाला पाठिंबा दिला नाही. मी कोणाच्याही विरोधात भडकाऊ भाषणे केली नाहीत. कदाचित तुम्हाला कोणीतरी चूकीची माहिती दिली किंवा तुमचा गैरसमज झाला आहे. हे पत्र मुंबईत राहणाऱ्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे सदस्य गुरिंदरसिंग बावा यांच्यामार्फत पाठवण्यात आले होते.
सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना शीख विरोधी म्हटले जात आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर १९८४ साली राजीव गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीदरम्यान खूप आरोप करण्यात आले होते. ज्यामुळे त्यांनी दुःखी होऊन पत्र लिहिले होते. त्यांनी पत्रात लिहिले होते की, ज्या वेळी खालसा पंथाचे जन्मस्थान श्री आनंदपूर साहिबमधील खालसा विरासत कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनासाठी बोलवण्यात आले होते. तेव्हा पंजाब सरकारचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले होते. मात्र त्यावेळी ते पोहचू शकले नाहीत कारण त्यांना कोणताही पेच निर्माण करायचा नव्हता.
त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पत्र लिहिले होते. त्यांनी या पत्रात म्हटले होते की, मी मानतो की गांधी आणि नेहरू कुटुंबाशी आमचे जुने नाते आहे ते आमच्या दुःखसुखात एकत्र आले आहेत. पण असे नाही आहे की मी कोणासाठी विरोधात्मक बोलू किंवा चुकीची घोषणाबाजी करेन. माझी अशी कोणतीच भावना नाही आणि कधीच नव्हती. हेच कारण आहे की हिंसा भडकवल्याचा आरोप चुकीचा आहे.