पहिल्याच चित्रपटात फ्लॉप झाला होता 'गब्बर'चा मुलगा, आता त्याला ओळखणंही झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 06:30 AM2019-09-20T06:30:00+5:302019-09-20T06:30:00+5:30
अमजद खान यांनी आपल्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये छाप उमटविली तशी त्यांचा मुलगा कमाल दाखवू शकला नाही.
अभिनेते अमजद खान बॉलिवूडमधील असे खलनायक आहेत ज्यांना आजही लोक शोलेतील गब्बर म्हणून ओळखतात. अमजद खान यांनी आपल्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये छाप उमटविली तशी त्यांचा मुलगा कमाल दाखवू शकला नाही. अमजद खान यांना दोन मुलं आहेत ते म्हणजे शादाब व सीमाब. मोठा मुलगा शादाब यांचा आज (ता. २० सप्टेंबर) वाढदिवस आहे. शादाबने आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनयात पदार्पण केलं.
अमजद खानचा मोठा मुलगा शादाबने १९९७मध्ये राणी मुखर्जीसोबतचा चित्रपट राजा की आएगी बारातमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. त्यानंतरदेखील शादाबने काही चित्रपटात काम केलं. पण ते चित्रपट जास्त कमाल दाखवू शकले नाहीत. त्यानंतर शादाबने बॉलिवूडमधून निरोप घ्यायचे ठरविले.
शादाबने अभिनय सोडून लेखणीला जवळ केलं आणि त्याचे वडील अमजद खान यांच्या बायोग्राफीवर काम करायला सुरूवात केली. २०१५ साली शादाबनं लिहिलेलं पुस्तक 'मर्डर इन बॉलीवुड'चे प्रकाशन अमिताभ बच्चन यांनी केलं होतं.
खरंतर अमजद खान व अमिताभ बच्चन खूप चांगले मित्र होते. शोले व्यतिरिक्त त्या दोघांनी एकत्र बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. त्या दोघांची मैत्री त्यावेळी खूप लोकप्रिय होती.
शादाबला अभिनयाचा वारसा वडिलांकडून मिळाला. पण, तो अमजद खान यांचा मुलगा म्हणून ओळखला जातो. शादाब व सीमाबने त्यांची वेगळी ओळख बनवण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनय सोडून शादाब खान भलेही लेखक बनला असला तरी तो त्याच्या क्षेत्रात उस्ताद आहे.