'विवाह' फेम अमृता रावचं 'Jolly LLb 3' सिनेमातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 13:33 IST2024-06-09T13:32:49+5:302024-06-09T13:33:27+5:30
'Jolly LLB 3' सिनेमात अमृताची वर्णी लागली आहे. या सिनेमातून अमृता पुन्हा मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेणार आहे.

'विवाह' फेम अमृता रावचं 'Jolly LLb 3' सिनेमातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
'इश्क विश्क', 'मस्ती', 'मै हूं ना', 'वाह लाइफ हो तो ऐसी', 'हे बेबी', 'जॉली LLB' या सिनेमांतून अभिनयाची छाप पाडणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे अमृता राव. अनेक सिनेमांमध्ये काम केलेल्या अमृताला २००६ साली प्रदर्शित झालेल्या विवाह सिनेमाने प्रसिद्धी मिळवून दिली. या सिनेमातील तिचं काम आणि तिने साकारलेल्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या 'ठाकरे' या सिनेमात अमृता शेवटची दिसली होती. या सिनेमात तिने मीना ठाकरेंची भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर मात्र अमृता मोठ्या पडद्यापासून दूर होती. आता अमृता 'Jolly LLB 3' सिनेमातून पुन्हा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे.
'Jolly LLB 3' सिनेमात अमृताची वर्णी लागली आहे. या सिनेमातून अमृता पुन्हा मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेणार आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, 'Jolly LLB 3' सिनेमात अमृता अर्शद वारसीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'Jolly LLB 3' सिनेमात 'Jolly LLB' सिनेमाची कथा पुढे सरकताना दिसणार आहे. 'Jolly LLB'मध्ये अमृताने अर्शद वारसीची गर्लफ्रेंड संध्या ही भूमिका साकारली होती. आता या सिनेमाच्या सिक्वलमध्ये त्या दोघांचं लग्न झाल्याचं दाखविण्यात येणार आहे.
'Jolly LLB 3' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून राजस्थानमध्ये सिनेमाचं शूटिंग होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शेड्युलमध्ये अमृता रावचं नावही आहे. पण, अद्याप याबाबत अमृता किंवा तिच्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
२०१३ मध्ये 'Jolly LLB ' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर २०१७मध्ये या सिनेमाचा सीक्वल प्रदर्शित करण्यात आला होता. आता तब्बल ७ वर्षांनी या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'Jolly LLB 3'मध्ये अर्शद वारसी, अमृता राव, अक्षय कुमार, हुमा कुरेशी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.