'मी घरात राहून रडत बसू शकले असते, पण...'; पहिल्यांदाच घटस्फोटावर व्यक्त झाली अमृता सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 05:42 PM2024-06-04T17:42:29+5:302024-06-04T17:43:11+5:30
Amrita singh: सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाल्यानंतर त्याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. मात्र, या दोघांनी कधीच या विषयी कुठे वाच्यता केली नाही. परंतु, एका मुलाखतीमध्ये अमृताने याविषयी उल्लेख केला.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (saif ali khan) त्याच्या सिनेमांमुळे जितका चर्चेत येतो त्याच्यापेक्षा कैकपटीने त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. यात खासकरुन त्याच्या आणि अभिनेत्री अमृता सिंह (amrita singh) यांच्या नात्याविषयी नेटकरी कायम काही ना काही तरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. जवळपास १२ वर्ष संसार केल्यानंतर या जोडीने घटस्फोट घेतला. विशेष म्हणजे अमृता शक्यतो याविषयावर बोलणं टाळते. मात्र, 'झूम'ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने घटस्फोट घेण्यामागचं कारण सांगितलं.
सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाल्यानंतर त्याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. मात्र, या दोघांनी कधीच या विषयी कुठे वाच्यता केली नाही. परंतु, एका मुलाखतीमध्ये अमृताने याविषयी उल्लेख केला. या मुद्द्यावर कोणाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, असं तिने यावेळी म्हटलं होतं.
नेमकं काय म्हणाली अमृता?
"त्यावेळी इतकं काही झालं होतं. मीडियामध्येही खूप काही बोललं जात होतं. त्यावर मी आता काय बोलणार? त्या माझ्या वैयक्तिक भावना होत्या. मला कोणासोबतच त्या शेअर करायच्या नव्हत्या. त्यावेळी माझं प्राधान्यक्रम माझी मुलं होती. त्यामुळे मला स्वत:ला सावरायचं होतं", असं अमृता म्हणाली.
पुढे ती म्हणते, "त्या गोष्टीतून मला लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं. कारण, माझ्या मुलांच्या मनात त्यांच्या पालकांविषयी कोणताही नकारात्मक भाव मला निर्माण करायचा नव्हता. मी घरात राहून घडलेल्या परिस्थितीवर रडत बसू शकले असते. पण माझ्या मुलांनी परिस्थितीसमोर हार पत्करावी हे मला मान्य नव्हतं."
दरम्यान, मध्यंतरी अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी देखील 'कॉफी विथ करण'मध्ये सैफ-अमृताच्या घटस्फोटावर भाष्य केलं होतं. "ती वेळ आमच्यासाठी चांगली नव्हती. कारण, इब्राहिम केवळ तीन वर्षांचा होता आणि आमचं सगळ्यांचंच त्याच्यावर खूप प्रेम होतं. अमृता आणि तिच्या दोन्ही मुलांची साथ गमावणं हे आमच्यासाठी खूप त्रासदायक होतं'', असं त्या म्हणाल्या होत्या.