माझे गुरू... नसीर सर...कृतज्ञ...! अमृता सुभाषला तिच्या गुरुंनी दिला होता ‘हा’ मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 10:47 AM2022-01-11T10:47:32+5:302022-01-11T10:56:00+5:30
निवडक भूमिका करणारी आणि त्या मनसोक्त जगणारी अभिनेत्री म्हणजे Amruta Subhash...तिचे गुरू कोण तर नसीरूद्दीन शाह
आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी सर्वांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष (Amruta Subhash). मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अमृता सुभाषचं नाव घेतलं जातं. मालिका, चित्रपट, नाटक आणि वेबसीरिज अशा सर्व माध्यमांमध्ये तिनं काम केलं. अर्थात इथवरचा प्रवास सोपा नव्हता. अमृताने बराच स्ट्रगल केला. या काळात अनेक जण थकतात, निराश होतात. पण अमृता मात्र याला अपवाद ठरली. निराश होण्याऐवजी तिची जिद्द वाढत गेली, उत्तमोत्तम भूमिका साकारण्याची तिची भूकही वाढत गेली. तिने निवडक भूमिका केल्यात आणि मनसोक्त जगल्या. भूमिका स्वीकारताना तिच्या गुरूचा सल्ला तिच्या कामी आला. आता अमृताचे गुरू कोण तर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह ( Naseeruddin Shah).
होय, ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अमृता तिच्या गुरूंबद्दल बोलली. एखादी भूमिका स्वीकारताना किंवा नाकारताना त्यामागे काय विचार असतो? असा प्रश्न तिला करण्यात आला. यावर तिने तिच्या नसीर सरांचा आवर्जुन उल्लेख केला. ती म्हणाली, ‘माझे गुरू नसीरूद्दीन शाह यांनी एकदा मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. पडद्यावर ज्या पात्राचा संघर्ष पडद्यावर दिसतो, त्याच भूमिका कर. संघर्ष नसेल ती भूमिका जगण्यात काहीही मजा नाही. मग भले ती कितीही मोठी आणि कितीही महत्त्वाची भूमिका असो, असं ते मला म्हणाले होते. माझ्या गुरूंचा हाच सल्ला भूमिका स्वीकारताना माझ्या डोक्यात असतो.’
अमृताने हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेतील नाटकात काम केलं. तिचं ‘ती फुलराणी’ हे नाटक खूप गाजलं. 2004 साली ‘श्वास’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अमृता ही एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका आहे. शिवाय लेखिका अशीही तिची ओळख आहे.
झी मराठी वाहिनी वरील ‘अवघाची हा संसार’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. नेटफ्लिक्सवरच्या ‘सेक्रेड गेम्स’ या मालिकेतील अमृताच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. झोया अख्तर दिग्दर्शित ‘गल्ली बॉय’ या चित्रपटातील तिची भूमिकाही लक्षवेधी ठरली.