'मुस्लिमविरोधी म्हणणाऱ्यांनी लोकांनी 'गदर 2' पुन्हा बघावा'; अनिल शर्माचं थेट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 04:35 PM2023-09-07T16:35:23+5:302023-09-07T16:37:35+5:30
'गदर 2' सीनेमाला मुस्लिमविरोधी बोलणाऱ्यांना दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी खडे बोल सुनावले.
सनी देओलचा अॅक्शन ड्रामा चित्रपट 'गदर 2' पहिल्या दिवसापासून बम्पर कमाई करतो आहे. अमीषा पटेल आणि सनी देओल स्टारर चित्रपटाला २२ वर्षांनंतर दुप्पट प्रेम मिळत आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये या सिनेमाने अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर केले आहेत. त्यामुळे हा सिनेमा सातत्याने चर्चेत येत आहे. तर, दुसरीकडे काही जण त्याला ट्रोलदेखील करत आहेत. हा सिनेमा मुस्लिमविरोधी असल्याचं म्हणत अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. मात्र, आता या ट्रोलिंगवर गदर-2 चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी मौन सोडलं आहे.
एका मुलाखतीमध्ये अनिल शर्मा यांना गदर-2 मुस्लिमविरोधी आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. उत्तरात ते म्हणाले की, "चित्रपट मुस्लिमविरोधी नाही. चित्रपटात एकता दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात गीता आणि कुराण या दोन्ही गोष्टींवर भाष्य करण्यात आलं आहे. चित्रपट मुस्लिम किंवा पाकिस्तानविरोधी बोलणाऱ्यांनी चित्रपट पाहिला नसेल. त्यांनी आधी चित्रपट पाहावा".
पुढे ते म्हणाले," दोन्ही गदर चित्रपटाच्या रिलीजमधील 22 वर्षांचे अंतर आहे. या काळात एक गोष्ट बदलली आहे. ती म्हणजे राजकीय वातावरण. आज लोकांच्या धार्मिक अस्मितेवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मी एक कलाकार आहे आणि जग कसे चालते हे मला समजत नाही. मला एवढेच माहित आहे की मला गदर 2 बनवायचा होता. कारण लोकांना तो बघायचा होता".
देशासह विदेशातही गदर 2 धुमाकूळ घालत आहे. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका आणि यूके सारख्या देशांमध्ये सुद्धा गदर २ पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत 'दंगल', 'केजीएफ-2' सारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे.