...अन् रणबीर कपूर भर कार्यक्रमात राजामौलींच्या पाया पडला, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 13:42 IST2023-11-28T13:42:00+5:302023-11-28T13:42:49+5:30
'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानही रणबीर राजामौलींच्या पाया पडला होता.

...अन् रणबीर कपूर भर कार्यक्रमात राजामौलींच्या पाया पडला, व्हिडिओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर 'ॲनिमल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून 'ॲनिमल'बाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या रणबीर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हैदराबाद येथे नुकताच 'ॲनिमल' सिनेमाचा प्रमोशन इव्हेंट पार पडला. या कार्यक्रमात सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकरांनी उपस्थिती दर्शविली होत. या कार्यक्रमामधील रणबीर कपूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
बॉलिवूड हंगामा या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रणबीरचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'ॲनिमल' सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी हजेरी लावली होती. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात रणबीर राजामौलींच्या पाया पडताना दिसला. भर कार्यक्रमात रणबीरने राजामौलींच्या पायाला हात लावत त्यांचा आशीर्वाद घेतला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रणबीरचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. तर कित्येकांनी त्याला ट्रोल करत सिनेमा हिट होण्यासाठी आणि राजामौलींनी चित्रपटात घ्यावं यासाठी रणबीर पाया पडत आहे, असं म्हटलं आहे. पण, रणबीरच्या या कृतीने त्याच्या चाहत्यांची मनं मात्र जिंकून घेतली आहेत. याआधी 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानही रणबीर राजामौलींच्या पाया पडला होता.
दरम्यान, बहुचर्चित 'ॲनिमल' हा रणबीर कपूरचा सिनेमा १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणबीरसह रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.