३ तास वाया! 'ॲनिमल' पाहिल्यानंतर भारताच्या स्टार क्रिकेटरचं ट्वीट; चांगला अभिनय म्हणजे...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 04:02 PM2023-12-07T16:02:47+5:302023-12-07T16:03:27+5:30
रणबीर कपूरचा 'ॲनिमल' पाहिल्यानंतर भारतीय क्रिकेटर संतापला, म्हणाला, "हा चित्रपट म्हणजे आपत्ती"
रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला 'ॲनिमल' सिनेमा १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या बिग बजेट सिनेमातील सीन्स आणि डायलॉग प्रचंड व्हायरल होत आहेत. 'ॲनिमल' मधील रणबीरच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर या सिनेमातील हिंसा आणि इंटिमेट सीन्स काही प्रेक्षकांना खटकले आहेत. अनेक सेलिब्रिटी आणि प्रेक्षक 'ॲनिमल' बाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर जयदेव उनाडकटनेही 'ॲनिमल' पाहिल्यानंतर एक ट्वीट केलं होतं.
'ॲनिमल' सिनेमा पाहिल्यानंतर उनाडकटने एक्सवर ट्वीट करत या चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त करत टीका केली होती. मात्र काही वेळाने त्याने हे ट्वीट डिलीट केलं. जयदेव उनाडकटने ट्वीटमध्ये 'ॲनिमल' सिनेमाबाबत त्याचं मत मांडलं होतं. "'ॲनिमल'सिनेमा म्हणजे एक आपत्ती आहे. महिलांना कमी लेखण्याच्या वृत्तीचं समर्थन करत त्याला पारंपरिक पौरुषत्व आणि प्रभावशाली पुरुष असा टॅग देणं लज्जास्पद आहे. आपण जंगल किंवा पॅलेसमध्ये राहून युद्ध करत नाही आहोत. किती चांगला अभिनय केला हे महत्त्वाचं नाही. अशाप्रकारच्या गोष्टींना चित्रपटातून महत्त्व दिलं गेलं नाही पाहिजे. कारण, मिलियन प्रेक्षक ते पाहतात. मनोरंजन क्षेत्रात असूनही समाजाप्रती काही कर्तव्य आहेत, त्याचा विसर पडता काम नये. हा चित्रपट पाहण्यात मी ३ तास वाया घालवले, यासाठी मला वाईट वाटतंय," असं उनाडकटने म्हटलं होतं. पण, काही वेळाने त्याने हे ट्वीट डिलीट केलं.
दरम्यान, पहिल्या दिवसापासूनच 'ॲनिमल'ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करायला सुरुवात केली होती. प्रदर्शनाआधीच 'ॲनिमल' सिनेमाने 'ॲडव्हान्स बुकिंगमधून कोटी रुपये कमावले होते. टीझरपासूनच या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सिनेमांचे रेकॉर्ड मोडायला सुरुवात केली. प्रदर्शनानंतर सहा दिवसातंच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
रणबीरच्या 'ॲनिमल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसला पछाडलं आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी ६३.८ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर वीकेंडलाही या चित्रपटाने दमदार कमाई केली. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार या सिनेमाने सहाव्या दिवशी ३० कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत 'ॲनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३१२.९६ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींचा आकडा पार केला आहे.