५४.७५ कोटींच्या ओपनिंगसह हिंदी चित्रपटांमध्ये 'अॅनिमल' तिसऱ्या स्थानी
By संजय घावरे | Published: December 2, 2023 04:23 PM2023-12-02T16:23:16+5:302023-12-02T16:24:18+5:30
पहिल्या दिवशी जागतिक पातळीवर ११७ कोटी रुपयांचा व्यवसाय; अॅडल्ट सिनेमाची सर्वात मोठी झेप
शुक्रवारी रिलीज झालेल्या रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. जनमानसांत प्रचंड कुतूहल असलेला हा सिनेमा सव्वा तीन तासांपेक्षा जास्त मोठा असूनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. याच बळावर या सिनेमाने ५४.७५ कोटी रुपयांच्या ओपनिंगसह भारतीय बाॅक्स ऑफिसवर सर्वाधिक ओपनिंग मिळवणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
अॅडव्हान बुकिंगमध्येही बाजी मारल्याने शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आलेल्या 'अॅनिमल'च्या शोलासुद्धा प्रेक्षकांनी गर्दी केली होती. सोशल मीडियापासून समीक्षकांपर्यंत सर्वचजण रणबीरच्या अभिनयाचे कौतुक करत असून, 'अॅनिमल'च्या प्रेमात आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम बॅाक्स ऑफिसवर दिसत आहे. आजवर बॅाक्स ऑफिसवर सर्वाधिक ओपनिंग मिळवणाऱ्या पाच हिंदी चित्रपटांच्या यादीत पहिल्या व दुसऱ्या स्थानी शाहरुख खानचा 'जवान' आणि 'पठाण' आहेत. या दोन्ही सिनेमांनी पहिल्या दिवशी अनुक्रमे ६५.५० कोटी आणि ५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यांच्या मागोमाग ५४.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवत 'अॅनिमल'ने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
'अॅनिमल'ने जागतिक पातळीवर केल्या इतक्या कोटींचा बिझनेस
यशचा 'केजीएफ २' हा चित्रपट ५३.९५ कोटींसह चौथ्या स्थानी, तर ऋतिक रोशन आणि टायगर श्रॅाफचा 'वॅार' ५१.६० कोटी रुपयांची कमाई करत पाचव्या स्थानी आहे. 'अॅनिमल'ने हिंदी वगळता इतर भाषांमधील चित्रपटांद्वारे ९.५ कोटी रुपयांचा गल्ला जमवत एकूण ६३.८० कोटी रुपयांचे नेट बॅाक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. जागतिक पातळीवर 'अॅनिमल'ने ११६ कोटी रुपयांचा ग्रॅास बिझनेस केल्याचे प्रोडक्शन हाऊसच्या वतीने घोषित करण्यात आले आहे.
'अॅनिमल' चित्रपटाबद्दल
'अॅनिमल' चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा प्रवास वाटतो तितका सोपा मुळीच नव्हता. विविध अडथळ्यांची शर्यत पार करत या चित्रपटाने यशाचा मार्ग शोधला आहे. अॅडल्ट 'ए' सर्टिफिकेट असूनही पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला चित्रपट बनला आहे. हा चित्रपट कोणत्याही सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी रिलीज झालेला नाही की कोणत्याही सणाच्या मुहूर्तावरही प्रेक्षकांसमोर आलेला नाही. हा चित्रपट कोणत्याही सुपरहिट चित्रपटाचा पुढील भाग नाही. यात कोणत्याही सुपरस्टारचा कॅमिओही नाही. 'अॅनिमल'समोर 'सॅम बहादूर'सारखा मोठा चित्रपट रिलीज झाला आहे. 'अॅनिमल'चा कालावधीही सव्वा तीन तासांपेक्षा जास्त आहे. इतक्या सर्व गोष्टी विरोधात असूनही 'अॅनिमल'ने बॅाक्स ऑफिसवर निशाणा साधला असून, रणबीरच्या करियरमधील सर्वाधिक ओपनिंग देणाऱ्या सिनेमाच्या यादीत या चित्रपटाने पहिला क्रमांक पटकावला आहे.