Sam Bahadur vs Animal : रणबीरचा 'ॲनिमल' ठरला वरचढ! पहिल्याच दिवशी 'सॅम बहादूर'पेक्षा १० पटीने कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 10:59 AM2023-12-02T10:59:31+5:302023-12-02T10:59:57+5:30
'ॲनिमल'ने बाजी मारली! 'सॅम बहादूर'ने किती कोटी कमावले? पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
यंदाचा शुक्रवार बॉक्स ऑफिस आणि बॉलिवूडसाठी रंजक ठरला. 'ॲनिमल' आणि 'सॅम बहादूर' हे बॉलिवूडचे दोन बहुचर्चित सिनेमे शुक्रवारी(१ डिसेंबर) प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने मेजवानी मिळाली. रणबीर कपूर आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमांच्या प्रतीक्षेत प्रेक्षक होते. त्यामुळे दोन्ही सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर काटें की टक्कर पाहायला मिळाली. प्रदर्शित होताच या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पण रणबीरचा 'ॲनिमल' चित्रपट विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'पेक्षा वरचढ ठरला आहे. 'ॲनिमल' आणि 'सॅम बहादूर' चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'ॲनिमल' चित्रपट टीझरपासूनच चर्चेत होता. या सिनेमातील रणबीरच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता या सिनेमाची कथाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं चित्र आहे. रणबीरचा 'ॲनिमल' पाहण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेला 'सॅम बहादूर'देखील प्रेक्षकांना भावला आहे. भारतीय लष्करातील पहिले फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या शौर्याची कथा या सिनेमातून रुपेरी पडद्यावर दाखविण्यात आली आहे. पण, कमाईच्या बाबतीत 'ॲनिमल' ने बाजी मारली आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, विकी कौशलच्या 'सॅम बहादूर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ५.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. तर 'ॲनिमल' चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशीच दमदार कमाई केली आहे. 'सॅम बहादूर' चित्रपटापेक्षा 'ॲनिमल'च्या पहिल्या दिवसाचे आकडे १० पटीने अधिक आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल ६१ कोटींची कमाई करत पठाणचा रेकॉर्ड मोडला आहे. आता वीकेंडला 'ॲनिमल' आणि 'सॅम बहादूर' सिनेमांमध्ये पुन्हा टक्कर पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, प्रदर्शित होताच 'ॲनिमल' आणि 'सॅम बहादूर' हे दोन्ही चित्रपट ऑनलाईन लीक झाले आहेत. त्यामुळे रणबीर कपूर आणि विकी कौशलचं टेन्शन वाढलं आहे. याचा चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होईल का? हे पाहावं लागेल.