बॉलिवूडला आणखी एक धक्का, कोरोनामुळे निर्माते अनिल सूरींचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 10:54 AM2020-06-06T10:54:28+5:302020-06-06T10:55:03+5:30
बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते अनिल सुरी यांचे कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे निधन झाले आहे.
कर्मयोगी, बेगुनाह आणि राज तिलक यांसारख्या चित्रपटांचे निर्माते अनिल सुरी यांचे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते आणि त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. अखेर 4 जूनला त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यांनी कायमचा जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताबद्दल त्यांचे भाऊ राजीव सुरी यांनी सांगितले. अनिल सुरी यांच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन मुलं आहेत.
राजीव सुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल यांची मागील काही दिवसांपासून तब्येत बिघडली होती. मात्र नंतर त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि तब्येत बिघडत गेली. इतकंच नाही तर राजीव यांनी आरोप केले की कित्येक हॉस्पिटलने अनिल सूरी यांनाअॅडमिट करून घेण्यास नकार दिला होता.
पीटीआयला राजीव सूरी यांनी सांगितले की, अनिल सुरी यांना 2 जूनला ताप आला होता. दुसऱ्याच दिवशी त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांची तब्येत आणखीन खालावली. त्यांना लिलावती व हिंदुजा सारख्या हॉस्पिटलमध्ये नेले पण त्यांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. मोठ्या रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे म्युनिसिपालिटीच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 4 जूनला डॉक्टरांनी सांगितले की काहीतरी गडबड आहे आणि त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले.
राजीव सुरी 1979 साली प्रदर्शित झाली बासू चॅटर्जी यांचा चित्रपट मंजिलचे निर्माते होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन व मौसमी चॅटर्जी मुख्य भूमिकेत होते. 4 जूनला सकाळी दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन झाले आणि संध्याकाळी सात वाजता अनिल सूरी यांनी अखेरचा श्वास घेतला. या गोष्टीमुळे दुःखी झालेल्या राजीव सूरी यांनी सांगितले की, एकाच दिवसात भाऊ आणि आवडते दिग्दर्शक यांच्या निधनामुळे मी खूप दुःखी झालो आहे.