अनुपम खेर या कारणामुळे जायचे दररोज अनिल कपूरच्या घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 08:00 PM2019-06-10T20:00:22+5:302019-06-10T20:03:36+5:30
यंदाच्या आठवड्यात द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात अनुपम खेर आणि ईशा गुप्ता हजेरी लावणार आहेत.
द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी देखील आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. यंदाच्या आठवड्यात या कार्यक्रमात अनुपम खेर आणि ईशा गुप्ता हजेरी लावणार आहेत.
सारांश या आपल्या पाहिल्याच चित्रपटात केलेल्या 65 वर्षांच्या वृद्ध निवृत्त शिक्षकाच्या भूमिकेपासून ते न्यू अॅमस्टरडॅम नामक आंतरराष्ट्रीय मालिकेत ‘डॉक्टर विजय कपूर’ पर्यंत अनेक अविस्मरणीय भूमिका साकारणारे आणि अत्यंत प्रशंसनीय कामगिरी करणारे अभिनेते अनुपम खेर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील द कपिल शर्मा शोच्या या वीकएंडच्या भागात दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री ईशा गुप्ता देखील या कार्यक्रमात दिसणार आहे. चित्रपट उद्योगाचा अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या अनुपम खेर यांच्यासोबत प्रेक्षक नक्कीच या कार्यक्रमात भूतकाळातील आठवणींत रमून जाणार आहेत.
तरुण अभिनेते आपला फिटनेस राखण्यासाठी मेहनत घेतात. पण त्याचसोबत पन्नाशीला आलेले कलाकारही स्वतःचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात, असे दिसून येते. द कपिल शर्मा या कार्यक्रमात जेव्हा कपिलने अनुपम खेर यांना त्याच्या फिटनेसचे रहस्य विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले, “खरं तर मी 60 वर्षांचा झाल्यानंतर नियमितपणे जिममध्ये जाऊ लागलो. फिट आणि फ्रेश राहणे यावर माझा फोकस असतो. मी पूर्वी तर व्यायाम करण्यासाठी माझा जवळचा मित्र अनिल कपूरच्या घरी जायचो. अनिल कपूरच्या घरात त्याचे एक खाजगी जिम आहे. मी तेथे जाऊन व्यायाम करत असे आणि अनिल मात्र व्यायामासाठी दुसरीकडे जात असे. मी एकटा आनंदाने व्यायाम करतो.”
अनुपम खेर सध्या एका आंतरराष्ट्रीय सिरीजमध्ये काम करत आहेत. पण त्यांचे स्वतःचे शिक्षण हिंदी माध्यमातून झालेले असल्याने त्यांना त्यांच्या सह-कलाकारांचे इंग्रजी शब्दोच्चार कळायला कठीण जातात असे त्यांनी या कार्यक्रमात कबूल केले. त्यावर कपिल शर्मा गंमतीने म्हणाला, “मलाही विदेशी शब्दोच्चार समजत नाहीत कारण ते खूप भराभर आणि एका दमात बोलतात.”
कुछ कुछ होता है या चित्रपटात अनुपम खेर आणि अर्चना पुरण सिंग यांनी एकत्र काम केले होते. त्यामुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळेसचे किस्से ते या कार्यक्रमात सांगणार आहेत.