'काश्मीर फाईल्ससाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता' अनुपम खेर यांनी व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 01:00 PM2023-10-29T13:00:03+5:302023-10-29T13:00:28+5:30
काही भूमिकांसाठी दिखाव्याची गरज नसते.
अनुपम खेर (Anupam Kher) हे बॉलिवूडमधील अतिशय प्रभावशाली अभिनेते आहेत. विनोदी किंवा गंभीर कोणतीही भूमिका असो त्यांनी त्यांचं १०० टक्के दिलं आहे. १९८४ साली त्यांनी महेश भट यांच्या 'सारांश' सिनेमातून पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी लहान वयातच ज्येष्ठाची भूमिका केली होती. यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. अनुपम खेर यांनी ५०० हून अधिक सिनेमात काम केलं आहे. दरम्यान गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात अनुपम खेर म्हणाले, "काश्मीर फाईल्समधील माझी भूमिका भावपूर्ण होती. मला त्यासाठी अभिनयाची गरज पडली नाही. कारण मी माझ्या भूमिकेत सच्चेपणा आणण्याचा प्रयत्न करतो. काही भूमिकांसाठी दिखाव्याची गरज नसते. पुष्कर नाथ ही भूमिकाही अशीच होती कारण ते सगळं मनातून आलं होतं."
ते पुढे म्हणाले,'द काश्मीर फाईल्समधलं माझं प्रदर्शन राष्ट्रीय पुरस्कारायोग्य होतं. तरी ज्यांना पुरस्कार मिळाले ते त्यासाठी पात्रही होते. जेव्हा मी पुष्पा सिनेमा पाहिला तेव्हा अल्लू अर्जुनच्या कामाची स्तुती केली होती. मी ट्वीटही केलं होतं. तरी मला पुरस्कार मिळाला नाही याबद्दल मी खंत व्यक्त करुच शकतो.'
69 व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात 'द काश्मीर फाईल्स'ला दोन पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय एकतावर सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी आणि पल्लवी जोशीला सहाय्यक अभिनेत्रीसाठी पुरस्कार मिळाला. काश्मीर फाईल्स ही अनुपम खेर यांच्या अत्यंत जवळची फिल्म आहे. कारण त्यांचं कुटुंबही काश्मीर मधील हिंसेला बळी पडलं होतं. राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.