चित्रीकरणादरम्यान अनुपम खेर यांच्या खांद्याला दुखापत, म्हणाले, " हसण्याचा प्रामाणिक प्रयत्न..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 01:08 PM2023-05-22T13:08:37+5:302023-05-22T13:10:01+5:30
अभिनेते अनुपम खेर सध्या 'विजय 69' या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त होते.
अनुपम खेर (Anupam Kher) बॉलिवूडमधील सर्वात अॅक्टिव्ह अभिनेते. याही वयात त्यांचा उत्साह हा वाखणण्याजोगा आहे. विविध धाटणीच्या भूमिका अगदी उत्तमपणे साकारणं हेच त्यांचं कौशल्य. नुकतंच त्यांनी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चाहते काळजीत पडले आहेत. अनुपम खेर यांना शूटदरम्यान खांद्याला दुखापत झाली असून त्याचा फोटो त्यांनी शेअर केलाय.
अभिनेते अनुपम खेर सध्या 'विजय 69' या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. हा खेळावर आधारित सिनेमा आहे. दरम्यान त्यांच्या खांद्याला चांगलाच मार बसला असून फ्रॅक्चर झालेला फोटो त्यांनी इन्स्टाग्रावर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले,"तुम्ही खेळावर आधारित एखादा सिनेमा करा आणि दुखापत होणार नाही, असं कसं होईल? काल विजय 69 च्या शूटिंग दरम्यान खांद्याला चांगलाच मार बसला. खूप दुखतंय पण sling लावणारे भैय्या म्हणाले की त्यांनी शाहरुख, हृतिक यांच्या खांद्यावरही उपचार केले होते. हे ऐकल्यावर कसं काय माहित पण वेदना कमी झाल्या. पण आता मी थोडाजरी जोरात खोकलो तर तोंडातून हलकी किंचाळी येतेच. फोटोमध्ये प्रामाणिकपणे हसण्याचा प्रयत्न केला आहे. एक दोन दिवसांनंतर शूटिंगला सुरुवात करणार आहे. तिकडे आईला समजल्यावर ती म्हणाली, अजून दाखव जगाला तुझी बॉडी. तुला नजर लागली. "
अनुपम खेर यांनी दुखापतीतही ह्युमर दाखवला आहे आणि चाहत्यांचं मनोरंजनच केलं आहे. कमेंटमध्ये सर्वांनी त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सध्या ते अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. मात्र आता दुखापतीमुळे त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.