अनुपम खेर गेले होते एका मुलीला प्रपोज करायला... पण त्याऐवजी बोलून गेले दुसरेच काही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 06:00 AM2019-06-11T06:00:00+5:302019-06-11T06:00:03+5:30
अनुपम खेर यांनी द कपिल शर्मा शो मध्ये त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींविषयी सांगितले.
द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी देखील आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. यंदाच्या आठवड्यात या कार्यक्रमात अनुपम खेर आणि ईशा गुप्ता हजेरी लावणार आहेत.
सारांश या आपल्या पाहिल्याच चित्रपटात केलेल्या 65 वर्षांच्या वृद्ध निवृत्त शिक्षकाच्या भूमिकेपासून ते न्यू अॅमस्टरडॅम नामक आंतरराष्ट्रीय मालिकेत ‘डॉक्टर विजय कपूर’ पर्यंत अनेक अविस्मरणीय भूमिका साकारणारे आणि अत्यंत प्रशंसनीय कामगिरी करणारे अभिनेते अनुपम खेर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील द कपिल शर्मा शोच्या या वीकएंडच्या भागात दिसणार आहेत. त्याच्या सोबत असेल देखणी अभिनेत्री ईशा गुप्ता. चित्रपट उद्योगाचा अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या अनुपम खेर यांच्यासोबत प्रेक्षक नक्कीच या कार्यक्रमात भूतकाळातील आठवणींत रमतील.
अनुपम यांच्या चाहत्यांना हे माहीत आहे की अनुपम खेर यांनी आपल्या तोतरेपणावर मात करून बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली. ‘इच्छा शक्ती’ आणि ‘धैर्य’ यावर दृढ विश्वास असणार्या अनुपम यांनी याविषयी कपिल शर्माच्या कार्यक्रमात सांगितले की, लहानपणी एक दगड त्याच्या तोंडाला लागून त्याला इजा झाली होती आणि त्यामुळे त्यांना ‘क’ हे अक्षर बोलता येत नसे आणि त्या ऐवजी ते ‘त’ बोलत असे. लहानपणीचा एक प्रसंग सांगताना अनुपम म्हणाले, “मी हिंदी माध्यमाच्या शाळेत होतो आणि त्यावेळी एका हिंदी माध्यमाच्या मुलाने एका इंग्रजी माध्यमाच्या मुलीपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवणे हे फारच धाडसाचे समजले जाई. अशा वेळी मी एका इंग्रजी माध्यमातील मुलीच्या प्रेमात पडलो, जिचे नाव कविता कपूर होते. परंतु, जेव्हा मी माझ्या भावना व्यक्त करणार होतो, त्याच वेळी तिने मला न अडखळता ‘कविता कपूर आय लव्ह यू’ असे म्हणायला सांगितले, जे मला जमणे शक्य नव्हते. मी तिच्या नावाचे आद्याक्षर व्यवस्थित उच्चारू शकलो नाही आणि त्यामुळे मला “तविता तपूर आय डोन्ट लव्ह यू" असे म्हणावे लागले.”
अनुपम खेर पुढे म्हणाले, मार्बल स्पीच थेरपीच्या उपचारांमुळे शेवटी तीन वर्षांनंतर त्यांना या तोतरेपणावर मात करता आली.