"मी त्याला हॉस्पिटलला जायला सांगितलं होतं, पण...", मृत्यूच्या ३ तास आधी सतीश कौशिक यांनी अनुपम खेर यांना केला होता फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 11:24 AM2024-02-25T11:24:35+5:302024-02-25T11:29:01+5:30
मृत्यूपूर्वी सतीश कौशिक यांनी अनुपम खेर यांना फोन केला होता, असं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितलं.
दिवंगत अभिनेता आणि दिग्दर्शक असलेले सतीश कौशिक यांनी २०२३मध्ये या जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने ९ मार्च २०२३ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने चाहते आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांची जिग्री दोस्ती होती. सतीश कौशिक यांच्या निधनाने अनुपम खेर यांनाही जबर धक्का बसला होता. मृत्यूपूर्वी सतीश कौशिक यांनी अनुपम खेर यांना फोन केला होता, असं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितलं.
सतीश कौशिक यांनी बरं वाटत नसल्याचं अनुपम खेर यांना सांगितलं होतं. तेव्हा अनुपम खेर यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्लाही दिला होता. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, "मी त्याला म्हणालो होतो की हॉस्पिटलमध्ये जा आणि अॅडमिट हो. आजारी म्हणून नाही रिसॉर्टला जात आहेस म्हणून जा आणि तिथे आराम कर. तेव्हा त्याने मला सकाळी जातो असं सांगितलं होतं. पण, मी त्याला रात्रीच हॉस्पिटलला जाण्याचा आग्रह केला होता. हॉस्पिटलला जात आहेस असा विचार करू नकोस...फाइव्ह स्टार हॉटेलला जात आहेस, असा विचार कर."
या मुलाखतीत त्यांनी सतिश कौशिक यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दलही सांगितलं. "१९७५ साली एका स्कूलमध्ये आम्ही भेटलो होतो. मी बसलो होतो तिथे माझ्या बाजूला येऊन तो बसला. तू इथे का बसला आहेस? असं मी त्याला विचारलं होतं. तेव्हा मी १९-२० वर्षांचा असेन. त्यामुळे माझ्या बाजूला एखाद्या मुलीने येऊन बसावं असं मला वाटत होतं. तू माझ्या बाजूला बसलास तर मला काय मिळेल? असं मी त्याला विचारलं होतं. तेव्हा त्याने मला मी हॉस्टेलमध्ये राहत नाही. इथला रहिवासी आहे. त्यामुळे तुला पराठे मिळतील, असं सांगितलं होतं," असं म्हणत अनुपम खेर यांनी आठवणींना उजाळा दिला.