हम आपके है कौन चित्रपटातील या प्रसिद्ध कलाकाराला मिळत नाहीये काम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 02:42 PM2019-06-11T14:42:35+5:302019-06-11T14:46:29+5:30
आजही हम आपके है कौन हा चित्रपट, या चित्रपटातील कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
हम आपके है कौन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला गल्ला जमवला होता. या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखांचे प्रचंड कौतुक झाले होते. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला होता. त्यामुळे आजही हा चित्रपट, या चित्रपटातील कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या चित्रपटात अनुपम खेर यांनी सिद्धार्थ चौधरी ही भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. अनुपम खेर हे बॉलिवूडमधील एक खूप चांगले अभिनेते असले तरी त्यांच्याकडे सध्या कोणतेही काम नाहीये.
सारांश या आपल्या पाहिल्याच चित्रपटात केलेल्या 65 वर्षांच्या वृद्ध निवृत्त शिक्षकाच्या भूमिकेपासून ते न्यू अॅमस्टरडॅम नामक आंतरराष्ट्रीय मालिकेत ‘डॉक्टर विजय कपूर’ पर्यंत अनेक अविस्मरणीय भूमिका साकारणारे आणि अत्यंत प्रशंसनीय कामगिरी करणारे अभिनेते अनुपम खेर यांना प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे. ते गेल्या 35 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत असून त्यांनी आजवर अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. अनुपम खेर यांना आता काम मिळत नाहीये असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही यावर विश्वास ठेवाल का? हो... पण हे खरं आहे. अनुपम खेर यांनी ही गोष्ट स्वतः सांगितली आहे.
नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी सांगितले आहे की, गेल्या 35 वर्षांत माझ्याकडे काम नाहीये असा एक दिवस देखील गेलेला नाहीये. मी कोणत्या ना कोणत्या चित्रपटासाठी काम करतच आहे. पण आता पहिल्यांदाच असे झाले आहे की, वन डे या चित्रपटानंतर माझ्याकडे काहीही काम नाहीये. 25 मे 1984 ला माझा सारांश हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. गेल्या अनेक वर्षांत माझ्या आयुष्यात चढ-उतार आले आहेत. इंडस्ट्रीत जे काही लोक चित्रपट बनवतात, त्यांनी माझ्याकडे यावे... मी सगळ्यांच्या चित्रपटांत काम करेन...
अनुपम खेर यांच्या वन डे या चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण झाले असून या चित्रपटात जाकिर हुसैन, जरीना वहाव, मुरली शर्मा, अनंत महादेवन आणि राजेश शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. अशोक नंदा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून हा चित्रपट 14 जूनला प्रदर्शित होत आहे.