Anupam Kher : 'लाल सिंह चड्डा' चांगला चित्रपट नव्हताच, 'बॉयकॉट ट्रेंड'वर अनुपम खेर यांनी केलं भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 10:16 AM2023-05-01T10:16:43+5:302023-05-01T10:17:49+5:30
सिनेमाचं अपयश पचवता आलं पाहिजे, अनुपम खेर बॉयकॉट ट्रेंडवर बोलले
अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. गेली अनेक वर्ष ते फिल्म इंडस्ट्रीत असून उत्तमोत्तम सिनेमे करत आहेत. नुकतेच त्यांनी 'बॉयकॉट बॉलिवूड' वर भाष्य केले. यासोबतच या ट्रेंडला कसं थांबवायचं याबाबतही चर्चा केली. आश्चर्य म्हणजे यावेळी त्यांनी आमिर खानचा (Amir Khan) 'लाल सिंह चड्डा' चांगला सिनेमा नव्हता असे वक्तव्य केले.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले, 'मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की बॉयकॉट ट्रेंडचा सिनेमावर परिणाम होत नाही. जर तुमचा चित्रपट चांगला आहे, तर तो चालणारच. मात्र जर तुमचा सिनेमा खराब आहे, तर त्यावर परिणाम नक्कीच होईल पण ते ट्रेंडमुळे नाही. सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. जर कोण्या अभिनेत्याला, अभिनेत्रीला या सिनेमासंबंधित कोणाही व्यक्तीला फिल्मच्या परिस्थितीबाबतीत बोलण्याचा अधिकार आहे, तर त्यांच्यात परिस्थितीतून जाण्याचं धाडसही असलं पाहिजे."
ते पुढे म्हणाले,"लाल सिंह चड्डा काही चांगली फिल्म नव्हती. जर हा सिनेमा चांगला असता तर कोणतीही ताकद त्याला थांबवू शकली नसती. आमिर खानचा पीके खरोखरंच चांगला सिनेमा होता. मुद्दा हा आहे की तुम्ही वास्तव स्वीकारलं पाहिजे. ज्यांना जे करायचं आहे त्यांना तुम्ही थांबवू शकत नाही. तुमचा सिनेमा चांगला असेल तर तुम्हाला प्रेक्षक मिळतीलच. या ट्रेंडला संपवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे तुम्ही चांगलं काम करा."
अनुपम खेर लवकरच 'इमर्जन्सी' सिनेमात दिसणार आहेत. कंगना रणौतने सिनेमा दिग्दर्शित केला आहे. यामध्ये कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे. याशिवाय 'मेट्रो इन दिनो'सिनेमातही खेर महत्वाची भूमिका साकारणार आहेत.