Anurag Kashyap:"लोकांना पनीरवर GST द्यावा लागतोय, म्हणूनच 'बायकॉट'चा गेम खेळला जातोय"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 11:26 AM2022-08-16T11:26:27+5:302022-08-16T11:45:45+5:30
Anurag Kashyap: अनुरागने या मुलाखतीत हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांबाबतही मत मांडल.
मुंबई - दिग्दर्शक अनुराग कश्यप आपल्या निर्भीड आणि देशातील मुद्द्यांवर बिनधास्तपणे आपलं मत मांडण्याच्या स्वभावामुळे ओळखले जातात. अनेकदा लोकांना अनुरागचं मत पटतही नाही, पण ते आपल्या मतावर ठाम असतात. आता, तापसी पन्नू यांच्यासोबतचा त्यांचा दोबारा हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अनुरागने हिंदी चित्रपट चालत नसल्यासंदर्भात विधान केलं आहे. जीएसटीचं उदाहरण देत अनुरागने समजावूनही सांगितलं.
अनुरागने या मुलाखतीत हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांबाबतही मत मांडल. जेवढं सांगण्या येत आहे, तेवढी स्थिती गंभीर नाही. बॉलिवूडमध्ये प्रत्येक प्रकारचा सिनेमा बनविण्यात येतो. पण, मोठ्या चित्रपटांना धरुन केवळ धारणा बनविण्यात येते. लोकांना कसं समजतं की दाक्षिणात्य सिनेमे चालतात म्हणून. गेल्या आठवड्यात कोणता दाक्षिणात्य सिनेमा प्रदर्शित झाला, हेही त्यांना सांगता येणार नाही. कारण, तिथेही सिनेमांची परिस्थिती हीच आहे. सध्या लोकांकडे चित्रपट पाहण्यास पैसेच नाहीत. येथे पनीरवरही जीएसटी लागू करण्यात आला आहे. जर लोक खाण्या-पिण्याच्या वस्तूंवर जीएसटी देणार असतील, तर त्यावरुन लोकांचं लक्ष हटविण्यासाठी हा बायकॉटचा गेम सुरू आहे, असे बेधडक वक्तव्य अनुराग कश्यपने मुलाखतीदरम्यान केले.
जे चित्रपट चांगले आहेत, याची खात्री करुनच लोक सिनेमे पाहायला जातात. किंवा ज्या सिनेमाची लोकांना खूप प्रतिक्षा असते, असेच चित्रपट ते पाहायला जातात. आपण क्रिकेट आणि सिनेमांवर गोष्टी झाडत बसतो, पण लोकांना कळतही नाही की देशात काय होत आहे, असे म्हणत त्याने देशातील आर्थिक परिस्थितीसंदर्भात भाष्य केले. देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे झाली, पण आजही बॉलिवूड इंडेपेन्डेंट नाही, असा टोलाही त्याने लगावला.