"तेव्हा सेन्सॉर बोर्ड म्हणालं मोदींनी जातीव्यवस्था नष्ट केलीय", 'फुले' सिनेमाच्या वादावर अनुराग कश्यप स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 09:08 IST2025-04-17T09:07:53+5:302025-04-17T09:08:41+5:30
अनुराग कश्यपने पोस्ट शेअर करत सेन्सॉर बोर्डावर ताशेरे ओढले आहेत. तसंच सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला आहे.

"तेव्हा सेन्सॉर बोर्ड म्हणालं मोदींनी जातीव्यवस्था नष्ट केलीय", 'फुले' सिनेमाच्या वादावर अनुराग कश्यप स्पष्टच बोलला
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित असलेला 'फुले' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमाच प्रतिक गांधी आणि पत्रलेखा यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'फुले' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका दृश्यावर ब्राह्मण समाजाच्या काही संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. 'फुले' चित्रपटावरुन झालेल्या वादामुळे सिनेमाची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली आहे. तर सेन्सॉर बोर्डानेही यातील काही दृश्यांवर कात्री मारली आहे. आता यावरुन बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने पोस्ट शेअर केली आहे.
अनुराग कश्यपने पोस्ट शेअर करत सेन्सॉर बोर्डावर ताशेरे ओढले आहेत. तसंच सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला आहे.
अनुराग कश्यपने पोस्टमध्ये काय म्हटलं?
"धडक २च्या स्क्रिनिंग वेळी सेन्सॉर बोर्डने असं सांगितलं की मोदींनी जातीव्यवस्था नष्ट केली आहे. याच आधारावर संतोष सिनेमादेखील भारतात प्रदर्शित झाला नाही. आता 'फुले' सिनेमावरुन ब्राह्मण समाजाला आक्षेप आहे. पण, भाऊ जर जाती व्यवस्थाच नाही राहिली तर ब्राह्मण कुठून आले? कोण आहात तुम्ही? तुम्हाला का त्रास होत आहे? जर जाती व्यवस्थाच नसती तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले नसते. एक तर ब्राह्मण नाहीच आहेत, कारण मोदींच्यानुसार भारतात जाती व्यवस्थाच नाहीये. की सगळे मिळून सगळ्यांना मुर्ख बनवत आहेत? भारतात जाती व्यवस्था आहे की नाही, हे तुम्ही मिळून आधी काय ते ठरवा. लोक मुर्ख नाहीत. तुम्ही ब्राह्मण आहात की तुमचे पूर्वज होते जे आता इथे नाहीत...काय ते ठरवा".
अनुराग कश्यपने याआधी 'फुले' सिनेमावरुन चाललेल्या वादामुळे संतप्त पोस्ट शेअर केली होती. 'फुले' या सिनेमाचं दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलं आहे. हा सिनेमा आधी ११ एप्रिल महात्मा फुले यांच्या जयंतीला रिलीज होणार होता. मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता सिनेमा २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.