आई-वडील, मुलीला धमक्या, अनुराग कश्यपने डिलीट केले ट्विटर अकाऊंट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 10:12 AM2019-08-11T10:12:56+5:302019-08-11T10:13:34+5:30
सोशल मीडियावर आपले मत खुलेपणाने मांडणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि त्याच्या कुटुंबाला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.
सोशल मीडियावर आपले मत खुलेपणाने मांडणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि त्याच्या कुटुंबाला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अनुरागचे आईवडिल आणि मुलगी यांना सतत धमकीचे फोन आणि मॅसेज येत आहेत. या धमक्यांमुळे अनुरागने अचानक एक मोठा निर्णय घेत, स्वत:चे ट्विटर अकाऊंट डिलीट केले आहे.
‘जेव्हा तुमच्या आई-वडिलांचा फोन येऊ लागतात. तुमच्या मुलीला धमक्या मिळतात, यावरून या मुद्यावर कोणालाच उघडपणे बोलायचे नाही, हे स्पष्ट होते. भामटे राज्य करतील आणि हीच जीवन जगण्याची नवी पद्धत होईल. सर्वांना नव्या भारतासाठी शुभेच्छा. हे माझे अखेरचे ट्विट आहे. कारण मी माझे ट्विटर अकाऊंट बंद करतोय. मला माझे विचार निर्भीडपणे मांडता येत नसतील तर मी आता बोलणारच नाही. गुड बाय...,’असे अखेरचे ट्विट करत, अनुरागने स्वत:चे ट्विटर अकाऊंट डिलीट केले.
यापूर्वी अनुराग कश्यपने एक स्क्रीन शॉट शेअर केला होता. यात एका युजरने अनुरागच्या मुलीला बलात्काराची धमकी दिली होती.
काही दिवसांपूर्वी अनुरागने जम्मू काश्मीरातील कलम 370 हटवण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. कलम 370 हटवण्याची पद्धत चुकीची आणि दहशत निर्माण करणारी असल्याचे त्याने म्हटले होते. यावरून तो प्रचंड ट्रोल झाला होता. मॉब लिचिंगविरूद्ध घेतलेल्या मोदीविरोधी भूमिकेमुळेही त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते.
सध्या अनुराग त्याच्या ‘सांड की आंख’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिका साकारणार आहेत.