कुस्तीपटू विनेश फोगाटसाठी अनुष्का शर्माची पोस्ट; म्हणाली, 'सर्वच आज मनाने खचले पण...'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 09:34 AM2024-08-08T09:34:14+5:302024-08-08T09:35:00+5:30
विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर सर्वच गदगदले.
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अंतिम सामन्याआधीच अपात्र ठरली. ५० किलो वजनी गटात केवळ १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने विनेशला अपात्र घोषित केलं गेलं. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. सर्व भारतीय विनेशला धीर देत असून तू आमच्यासाठी चॅम्पियनच राहशील असा संदेश देत आहेत. बॉलिवूड कलाकारांनीही विनेशसाठी त्यांच्या मनातील भावना शेअर केल्या. विनेशसोबत जे घडलं त्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माही (Anushka Sharma) दु:खी झाली आहे.
अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर विनेश फोगाटसाठी पोस्ट लिहिली. ती म्हणते, 'आपल्या सगळ्यांचंच मन आज खचलं आहे. पण तू कोणत्या परिस्थितीतून जात आहेस याची मी कल्पनाही करु शकत नाही. तू खरी चॅम्पियन आहेस. भारतीय म्हणून तुझा सर्वांना अभिमान वाटतो. हे जग पुन्हा तुझी कामगिरी नक्की पाहील.''
विनेश फोगाट 50 किलो वजनी गटाच्या कुस्ती सामन्यातून बाद झाली. याआधी तिने वर्ल्ड नंबर 1 महिला खेळाडूला हरवून सेमीफायनल आणि नंतर फायनलपर्यंत धडक मारली होती. विनेशने भारतासाठी पदक निश्चित केलं होतं. काल रात्री फायनल असताना सकाळीच तिच्या अपात्रतेची घोषणा झाली. तिचं वजन 52 किलो झालं होतं. एका रात्रीत तिने वजन कमी केलं. केस कापले, रक्त काढलं, पूर्ण रात्र ती वजन कमी करण्यासाठी धडपडत होती. मात्र तरी 100 ग्रॅम जास्त भरलं. यामुळे तिला अपात्र घोषित केलं गेलं. तिच्यासोबत सर्वच भारतीयांचं मेडलचं स्वप्न अपूर्ण राहिलं. विनेश ऑलिम्पिक फायनलपर्यंत जाणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती. ऑलिम्पिकमधील या झटक्यानंतर विनेश फोगाटने आज सकाळीच निवृत्ती जाहीर केली.